लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालक कम वाहक पदाची भरती प्रक्रिया गतवर्षी राबविली. यातील काही लोकांना नियुक्ती देण्यात आली, तर काहींचे प्रशिक्षण अर्धवट राहिले. नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची सेवाही लाॅकडाऊनमुळे खंडित करण्यात आली. या काळात त्यांना मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. सात ते आठ महिनेपर्यंत त्यांच्याजवळ कुठलाही रोजगार नव्हता. आधीचा रोजगार सोडल्याने त्यांना रिकामे राहण्याशिवाय इलाज राहिला नाही. काही लोकांचे प्रशिक्षणही अर्धवटच राहिले. चालक कम वाहक पदाची भरती असल्याने दोनही प्रशिक्षण पूर्ण झाल्याशिवाय नियुक्ती देण्यात आलेली नाही. एकीकडे कोरोनामुळे प्रशिक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती उठल्याशिवाय प्रशिक्षण होणार नाही आणि नियुक्तीही मिळणार नाही, असे उमेदवार अडचणीत आले आहे. त्यांना प्रशिक्षण लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. प्रशिक्षणाअभावी त्यांची नोकरीही लटकली आहे.
कोरोना संसर्गामुळे लटकले प्रशिक्षणनोकरभरती होत नाही तोच कोरोनाचे लाॅकडाऊन सुरू झाले. त्यामुळे काही लोकांना पूर्ण प्रशिक्षण मिळाले नाही. चालकाचे प्रशिक्षण झाले. मात्र, वाहकाचे झाले नसल्यामुळे नियुक्तीही लटकली आहे.
प्रशिक्षण अर्धवटच...
लालपरीच्या स्टेअरिंगवर बसण्याची संधी लवकरच मिळेल, अशी आशा होती. मात्र, प्रशिक्षणच अपूर्ण राहिले. सध्या तरी नियुक्तीचा आदेश मिळालेला नाही. मागील दहा महिन्यांपासून कामधंदा बंद आहे. आधी खासगी बसवर काम करून उदरनिर्वाह चालवित होतो.- प्रतीक्षेतील उमेदवार
आधीचा कामधंदा सोडून एसटीच्या नाेकरभरतीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, प्रशिक्षण पूर्ण झाले नाही. अन् नोकरीही मिळाली नाही. आता खासगी वाहनावर चालक म्हणून काम करून रोजगार मिळविला जात आहे. प्रशिक्षण लवकर सुरू व्हावे, ही अपेक्षा आहे.- प्रतीक्षेतील उमेदवार
नियुक्ती दिल्यानंतर पुन्हा सेवा खंडित...
एसटीची नोकरी मिळणार असल्याने आधीचा रोजगार सोडून दिला. लाॅकडाऊन सुरू झाल्याने एसटीत अवघे काही दिवस काम करण्याची संधी मिळाली. पुढे सेवा खंडित करण्यात आली. तब्बल सात महिनेपर्यंत घरी राहावे लागले. अडचणींचा सामना करावा लागला.- खंडित सेवेतील कर्मचारी
लाॅकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागले. उधार-उसणवार करून दिवस काढावे लागले. अजूनही यातून सावरलो गेलाे नाही. काही वेळा ड्युटी मिळत नाही. त्यामुळे महिन्याकाठी अपेक्षित तेवढा पैसा हाती येत नाही. या प्रकारात आर्थिक अडचणी येत आहेत.- खंडित सेवेतील कर्मचारी
आदेशानंतर प्रशिक्षण सुरू होईलमहामंडळाच्या आदेशानंतर प्रशिक्षणाला सुरुवात होणारच आहे. त्यामुळे प्रशिक्षण अपूर्ण असलेल्या लोकांना संधी मिळेल. कामाशिवाय पगार नाही, या धाेरणामुळेच काम न केलेल्या लोकांना पगार मिळाला नाही.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ