लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पहिल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना बदल्यांची आतुरता लागली आहे. आता बदलीचे नवीन धोरण जाहीर झाल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र यंदाही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने बदली प्रक्रियेवर स्थगितीची टांगती तलवार आहे. जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेत सामील होण्याची शक्यता आहे. मात्र नव्या धोरणानुसार ३१ मेपर्यंतच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर जिल्ह्यात सध्या कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या व इतरही कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांवरच काम करीत आहे. अशा वेळी शिक्षकांचे ऑनलाईन अर्ज भरणे, त्याची पडताळणी होणे, रिक्त पदांची यादी तयार होणे, तत्पूर्वी सेवाज्येष्ठता यादी अंतिम होणे या प्रक्रियेला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. शिवाय एक संवर्ग आटोपल्यावर इतर चार संवर्गाच्या बदल्या करण्यासाठीही महिनाभराचा कालावधी लागणार आहे. मेमध्ये कोरोना कमी न झाल्यास मागील वर्षीप्रमाणेच बदल्यांना स्थगिती मिळण्याची भीती आहे.
पसंतीक्रम देण्याची संधी वाढली जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना २० शाळांचा पर्याय निवडण्याची मुभा होती. मात्र आता नव्या धोरणानुसार शिक्षकांना तब्बल ३० शाळांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. त्यामुळे मनपसंत गाव निवडणे सोपे होणार असले तरी या प्रक्रियेत अनेकांचे पसंतीक्रम ‘रिपिट’ होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. आधी रिक्त जागा जाहीर होणार असल्याने शिक्षकांची सोय झाली आहे.
सीईओंची समिती बजावणार मुख्य भूमिका मागील वेळी पुण्यातील एनआयसी केंद्रातूनच संपूर्ण बदली प्रक्रिया झाल्याने जिल्ह्यात अनेक घोळ पुढे आले होते. यावेळी मात्र ऑनलाईन प्रक्रिया होणार असली तरी त्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच बदली प्रक्रियेवर वाॅच ठेवणार आहे. जिल्ह्यातील अवघड क्षेत्रही तेच ठरविणार आहे. शिवाय बदलीपूर्वी ऑनलाईन प्रक्रियेबाबत जिल्हा परिषदेत शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यामुळे यावेळची प्रक्रिया शिक्षकांच्या मनाप्रमाणे होण्याची शक्यता आहे.
शिक्षणाधिकारी म्हणतात.... जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया यापुढेही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. मात्र संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. सर्वात आधी जिल्ह्यातील शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार केली जाईल. रिक्त जागा निश्चित केल्या जाईल. त्यानंतरच जिल्ह्यात यंदा किती शिक्षकांच्या बदल्या होतील, हे सांगता येईल. - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
बदल्यांसाठी शासनाने जाहीर केलेला नवा जीआर सर्वसमावेशक आहे. शंभर टक्के समाधान कधीही आणि कुणाचेही होऊ शकत नाही. मात्र आता नव्या जीआरनुसार तरी यवतमाळ जिल्हा परिषदेने तातडीने बदली प्रक्रिया राबवावी, याबाबत आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. २०१६, २०१७, २०१९, २०२० या वर्षात बदल्या झाल्या नाही. यंदा मात्र प्रक्रिया पूर्ण करावी, मागील वर्षाप्रमाणे कोरोनाचे कारण देऊन ऐनवेळी प्रक्रिया स्थगित करू नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे अडचण येण्याची शक्यता नाही. - दिवाकर राऊत जिल्हाध्यक्ष, इब्टा शिक्षक संघटना