पीसीसीएफ’कडे पाठविला अहवाल : वन विकास महामंडळाच्या सहा हजार हेक्टर जंगलात वास्तव्य यवतमाळ : राळेगाव तालुक्यासह लगतच्या परिसरात पट्टेदार वाघाची चांगलीच दहशत पसरली आहे. आॅगस्ट महिन्यात दोघांंना वाघाने ठार केले. जनावरांच्या शिकारीच्या घटना सातत्याने होत आहे. वन विकास महामंडळाच्या सहा हजार हेक्टरमध्ये पसरलेल्या घनदाट जंगलात या वाघाने आश्रय घेतला आहे. अनेकदा रस्त्यावर त्याचे दर्शन होत असल्याने प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडत आहे. आता या वाघाला ट्रॅप करण्यासाठी वन विभागाने या परिसरात ५० कॅमेरे लावले आहे. शिवाय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे अहवाल पाठविला आहे. राळेगावातील खैरगाव (कासार), मोहदरी शेतशिवारात एकाच आठवड्यात वाघाने दोघांचा बळी घेतला. या सलगच्या घटनानंतर नागरिकांमध्ये वाघाची प्रचंड दहशत आहे. शिवाय वन विभागाकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्याने संतापही व्यक्त केला जात आहे. कळंब-राळेगाव या मार्गावर वाघाचे अनेकदा अनपेक्षित दर्शन घडले आहे. त्यामुळे आता दुचाकीवरून प्रवास करणेही धोक्याचे ठरत आहे. राळेगाव तालुक्यात सहा हजार हेक्टरवर वन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील जंगल पसरले आहे. या जंगल परिसराला शेत जमिनी लागून आहेत. त्यामुळे या परिसरात जनावरांसह मनुष्याचीही नेहमीच वर्दळ राहते. वाघामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली. वाघासंदर्भात पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाने अहवाल तयार केला. हा परिसर वाघास वास्तव्य करण्या योग्य नसून इतरत्र हलविण्यात यावे, असा अहवाल मुख्य वनसंरक्षकांना पाठविला. मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने हा अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्या कार्यालयात पाठविला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
राळेगावातील वाघ टिपण्यासाठी ५० कॅमेरांचा ट्रॅप
By admin | Published: September 23, 2016 2:40 AM