लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन खात्याच्या यवतमाळ परिक्षेत्रात पट्टेदार वाघ व बिबट्यांचा अनेक महिन्यांपासून मुक्तसंचार आहे. वाघाने अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. नागरिकांची ओरड वाढल्याने आता वन विभागाने पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. यवतमाळ शहराला लागून असलेला परिसर ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. हा बहुतांश भाग यवतमाळ वनपरिक्षेत्रात समाविष्ट आहे. या ग्रामीण भागात अनेक महिन्यांपासून पट्टेदार वाघाचा संचार आहे. नागरिकांना त्याचे दर्शनही झाले आहे. लखमापूर, आसोला, लोहारा, उमर्डा, एमआयडीसी, चाैसाळा, मोहा, मासोळी, बोरगाव, मादणी, ढुमणापूर, चिचबर्डी, बहिरम टेकडी, नाका पार्डी, हिवरी परिसर आदी भागांत या वाघाचा मुक्तसंचार आहे. अनेक दिवस तो एमआयडीसीतील एका केळीच्या शेतात लपून होता. त्याने चाैसाळा मार्गावरील बोदड परिसरात शेतात असलेल्या गोठ्यात जाऊन गोऱ्हा ठार केला. यापूर्वी त्याने सोनखास हेटी, लखमापूर, किटा येथेसुद्धा पाळीव प्राण्यांच्या शिकारी केल्या आहेत. बोदडच्या शेतात तो दोन ते तीन वेळा येऊन गेला. शेतमालकाने गजगोट्याचा आवाज करून त्याला पांगवले. हा गोठा नागरी वस्तीपासून अवघा ५०० मीटर अंतरावर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते. वाघाचे वेगवेगळ्या भागांत अनेक नागरिकांना दर्शन झाले. त्यामुळे दोन ते तीन पट्टेदार वाघ असावेत, असा अंदाज आहे. परंतु वाघाचे संचारक्षेत्र ४० किलोमीटरच्या परिघात राहात असल्याने एकच वाघ वेगवेगळ्या भागात दिसत असावा, असा दावा वन विभागाकडून केला जात आहे. तीन नव्हेतर, एकच वाघ असल्याचे वन अधिकारी ठासून सांगत आहेत. व्याघ्रदर्शन व पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याची ओरड वाढल्यानंतर आता वन विभागाने पाणवठ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्रात १५ ते २० पाणवठे तयार करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी नागरी वस्त्यांमध्ये जाऊ नयेत, जंगलातच त्यांना पाणी उपलब्ध व्हावे हा उद्देश यामागे आहे. या पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकले जाते. वन्यप्राणी या पाणवठ्यांवर येतात म्हणून तेथे ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रत्येकी ५० हजार रुपये किंमत असलेले हे ट्रॅप कॅमेरे चोरी जाण्याच्या भीतीने पाणवठ्यावर सायंकाळी लावले जातात व सकाळी ६ वाजता काढून घेतले जातात. वाघाचे अनेकांना दर्शन झाले, शिकारी सुरू आहेत. त्यानंतरही वन विभाग वाघाला पकडण्यासाठी काहीच करत नाही, अशी नागरिकांची ओरड आहे. वन विभाग मनुष्याच्या शिकारीची प्रतीक्षा करीत आहे का? कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असे संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत.
जोडमोहा परिसरातही पट्टेदार वाघ यवतमाळ व हिवरी वनपरिक्षेत्रात दिसणारा वाघ एकच असल्याचे वन विभाग सांगतो. मात्र जोडमोहा वनपरिक्षेत्रात दिसणारा वाघ वेगळा असल्याचे मान्य केले जात आहे. गेल्या वर्षी या वाघाचे दर्शन झाले होते. अलीकडे तो कुणाला गवसला नाही. याच वाघाने रुढा परिसरात महिलेवर हल्ला केल्याचा संशय आहे.
वाघाचे लोकेशन शोधता यावे यासाठी पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाघाने पाळीव प्राण्यांच्या शिकारी केल्या आहेत. वाघाचे नेमके लोकेशन कळल्यास पुढील कार्यवाही करणे सोपे होईल. - प्रिया गुल्हाने वनपरिक्षेत्र अधिकारी, यवतमाळ