ऑनलाईन लोकमतयवतमाळ : मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने शनिवारी अमरावतीत दुतोंड्या सापाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असतानाच यवतमाळातही शुक्रवारी तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला. यवतमाळ-पुसद बसमध्ये साप पिशवीतून अचानक बाहेर निघाल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली आणि तस्करीचा हा प्रकार निष्पन्न झाला. मात्र प्रकरण पोलिसात जाण्यापूर्वीच तस्कर दारव्ह्यातून निसटला.प्रत्यक्षदर्शी एका शासकीय कर्मचाऱ्यांने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी यवतमाळवरून पुसदला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स निघाली. यावेळी एका व्यक्तीने आपल्याकडील पिशवी चालकाच्या बाजूने ठेवून तो मागे काही अंतरावरील सिटवर बसला. त्याचा पूर्ण प्रवासात त्या पिशवीवर वॉच होता. ही ट्रॅव्हल्स यवतमाळचा घाट ओलांडून दारव्ह्याकडे मार्गस्थ झाली असताना अचानक चालकाने आरडाओरड करीत ब्रेक लावले. समोर एखादा वन्यप्राणी आडवा आला असावा म्हणून समोर बसलेले प्रवासी काचातून रस्त्याकडे पाहू लागले. मात्र, काहीच दिसत नव्हते. याचवेळी चालकाची घाबरगुंडी उडाली. कारण, एक भलामोठा साप त्याच्या काचावर आतल्या बाजूने दिसून आला. सापाबाबत आरडाओरड होताच मागे सिटवर बसलेला तो व्यक्ती पुढे आला व त्याने लगेच साप असलेली पिशवी आपल्या ताब्यात घेतली. त्या पिशवीला छिद्र असल्याने हा साप बाहेर निघून चालकाच्या स्टेअरिंगपर्यंत पोहोचला होता. ट्रॅव्हल्समधून सापाची वाहतूक आणि तेही निर्धास्तपणे होत असल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर प्रकरण पोलिसात जावू नये म्हणून तो तस्कर हातापाया पडत होता. अखेर तो चालकाला ‘अॅडजेस्ट’ करून दारव्हा येथे निसटला. मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे सापाची तस्करी करणाºया चौघांना अटक केली. त्यांच्याजवळून साडेचार किलोचा दुतोंड्या साप जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची किमत पाच कोटी आहे. हा सौदा अडीच कोटीत ठरला होता.मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोपुढे आव्हानगुप्तधनाच्या नावाने होणारी दुर्मिळ दुतोंड्या (मालन) सापाची ही तस्करी मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, स्थानिक क्राईम ब्रांच आणि वन प्रशासनापुढे खुले आव्हान ठरली आहे.सापाच्या तस्करीसाठी ट्रॅव्हल्स बसचा वापर केला जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अशाच पद्धतीने एसटी बस, खासगी प्रवासी वाहनांचाही वापर केला जात असण्याची शक्यता आहे. ट्रॅव्हल्समधील सदर व्यक्ती वारंवार कुणाला तरी फोन करून मी पुसद बसस्टॅन्डवर पोहोचतो, असे सांगत होता. यावरून तो साप पुसद भागात नेला जात होता, हे स्पष्ट होते. जिल्ह्याच्या काही भागात गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या सक्रिय आहे. या टोळ्यांचे शेकडो सदस्य आहे. गुप्तधनासाठी हे सदस्य नेहमीच दुतोंड्या साप, पायाळू व्यक्तींच्या मागावर असतात. यातूनच सापांची तस्करी वाढली आहे. दुतोंड्या म्हणविल्या जाणाऱ्या सापासाठी बाजारात चार ते पाच लाख रुपये मोजले जातात. गुप्तधनाच्या अशाच अंधश्रद्धेतून घाटंजी तालुक्यातील चोेरंबा येथे सपना पळसकर या बालिकेचा तिच्या रक्ताच्या नातेवाईकांनीच बळी दिला होता. यातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गुप्तधनासाठी सापांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:18 PM
मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने शनिवारी अमरावतीत दुतोंड्या सापाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असतानाच यवतमाळातही शुक्रवारी तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला.
ठळक मुद्देट्रॅव्हल्समध्ये भंडाफोड : पुसद बसमधील प्रकार, तस्कर दारव्ह्यातून निसटला