लाचखोरीत अटक केल्याचेप्रकरणयवतमाळ : दुचाकी आणि वैयक्तिक संगणक खरेदीच्या अग्रीमाचे देयक काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना अपर कोषागार अधिकारी संजय मेश्राम याला येथील जिल्हा कोषागार कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आली. अटकेनंतर तासभराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्या येथील पाटीपुरा परिसरातील घराची झडती घेतली. त्यामध्ये त्याची एकूण संपत्ती ३० लाख रुपयांची आढळून आली. अपर कोषागार अधिकारी संजय सेवकराम मेश्राम रा.पाटीपुरा हा कुठल्याही देयकासाठी लाचेची मागणी करायचा. अन्यथा काम अडवून ठेवायचा. अशा अनेक तक्रारी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान, एका कर्मचाऱ्याला शासनाच्या योजनेतील दुचाकी आणि वैयक्तिक संगणक खरेदीसाठी अनुदानाचा प्रस्ताव मंजूर झाला. त्याने याच्या अग्रीमाचे देयक कोषागार कार्यालयात सादर केले होते. हे देयक त्रुटीत न काढता निकाली काढण्यासाठी मेश्राम याने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला लाच घेताना सोमवारी अटक केली. घरझडती आणि चौकशीत त्याच्याकडे २५ लाखांचे घर, सोन्याचांदीचे दागिने आणि रोख अशी एकूण ३० लाखांची संपत्ती त्याच्याकडे आढळून आली. या व्यतिरिक्त त्याने नातेवाईक अथवा अन्य कुणाकडे संपत्ती दडवून ठेवली का, याचा तपास सुरू असल्याचे डीवायएसपी देशमुख यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
कोषागार अधिकाऱ्याकडे ३० लाखांची संपत्ती
By admin | Published: November 04, 2014 10:46 PM