लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव(देवी) : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्यासह अधिकाऱ्यांनी किडनीग्रस्त आसोला गावाला रविवारी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. या गावातील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.१३६१ लोकसंख्येच्या या गावात किडनीच्या आजाराचे १४ बळी ठरले आहेत. अनेक रुग्ण आजाराशी झुंज देत आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर आरोग्य विभागाने पाहणी केली. रक्ताचे नमुने घेतले. एवढ्यावरच आरोग्य विभागाची जबाबदारी थांबल्याचे दिसून येते. दरम्यानच्या काळात या गावाला पालकमंत्र्यांसह अनेक पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी भेट दिली.रविवारी आरोग्य सभापती नंदिनी दरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डी.जी. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी किशोर गुजर, वैद्यकीय अधिकारी जया चव्हाण, सुरेश चिंचोळकर, प्रा. घनश्याम दरणे यांनी किडनीग्रस्त रुग्ण आणि इतर ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपसरपंच विनोद जाधव, धर्मेंद्र बोदळे, सुधीर सोनटक्के, प्रशांत कारमोरे, सारिका वनवे, नलिनी वरघट यांनी समस्या मांडल्या. योग्य उपाययोजना केल्या जाईल, असे सभापती आणि अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.रुग्णालय ५० किलोमीटरवरआसोला हे गाव ५० किलोमीटर दूर असलेल्या सावरगड आरोग्य केंद्राशी जोडले गेले आहे. यवतमाळ ३५ किलोमीटर आणि तेथून सावरगड १५ किलोमीटर आहे. ही बाब ग्रामस्थांनी वेळोवेळी आरोग्य सभापतींकडे मांडली. लोकसंख्येच्या तुलनेत आसोला गावात आरोग्य केंद्र मिळणार नसल्याचे स्पष्ट केले गेले.पाण्याची दहशतपाणी दूषित असल्याने किडनीचा आजार झाला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जाते. आरोग्य विभागाने वेळोवेळी केलेल्या पाहणीत या गावातील पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल दिला. मात्र भेट देण्यासाठी येणारे पदाधिकारी, अधिकारी मात्र सोबत पिण्याच्या पाण्याची बॉटल घेऊन येतात. या गावातील पाण्याचा अनुभव स्वत: घेण्याचे ते टाळतात.
किडनीग्रस्तांवर ५० किमीवरून उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 9:50 PM
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्यासह अधिकाऱ्यांनी किडनीग्रस्त आसोला गावाला रविवारी भेट दिली.
ठळक मुद्देग्रामस्थांशी चर्चा : आरोग्य सभापतींची भेट, सावरगड आरोग्य केंद्राला जोडलेले गाव