लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काेराेना महामारीच्या संकटानंतर म्युकरमायकाेसिस या आजाराने डाेके वर काढले आहे जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. मात्र त्यावर येणारा उपचार खर्च हा सर्वसामान्य रुग्णाला न परवडणारा आहे. त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी महात्मा फुले जनआराेग्य याेजनेत या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. म्युकरमायकाेसिस या आजारावर उपचार करण्यासाठी १९ पॅकेज आहेत. यात ११ प्रकारच्या शस्त्रक्रिया व ८ प्रकारचा औषधाेपचार केला जाताे. म्युकरमायकाेसिस हा आजार प्रामुख्याने काेराेनातून मुक्त झालेल्यांना हाेत आहे. त्यांच्या जबड्यात काळी बुरशी आढळत आहे तर डाेक्यातही संसर्ग हाेऊन डाेळा निकामी हाेण्याचा धाेका वाढला आहे. अशा स्थितीत गरीब रुग्णांना दीर्घकाळ उपचार घेणे आर्थिक कारणाने न परवडणारे आहे. अनेकदा रुग्णाचा डाेळा काढून टाकावा लागताे. जबड्यावर शस्त्रक्रिया करून नंतर त्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागते. बुरशीमुळे निकामी झालेले भाग काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही. यासाठी रुग्णाला अनेक दिवस रुग्णालयात दाखल राहावे लागते. त्यामुळे गरीब रुग्णांना हा उपचार मिळावा याकरिता म्युकरमायकाेसिसच्या उपचाराला जनआराेग्य याेजनेतून मान्यता देण्यात आली आहे. सध्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा उपचार दिला जात आहे. म्युकरमायकाेसिस झालेल्या एका रुग्णाला जनआराेग्य याेजनेतून अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. उपचाराच्या १९ प्रकारांपैकी ११ प्रकारच्या शस्त्रक्रिया जनआराेग्य याेजने अंतर्गत केल्या जात आहेत. ८ प्रकारच्या औषधींचा खर्चसुद्धा जनआराेग्य याेजनेतून देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील गरीब रुग्णांना याचा फायदा हाेणार आहे. दीड लाखाची खर्च मर्यादा असली तरी त्यापुढच्या खर्चासाठीदेखील ही याेजना इन्शुरन्स माेडवर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांला आणखी जास्त सुविधा मिळणार आहेत.
म्युकरमायकाेसिस आजारावर जनआराेग्य याेजनेतून माेफत उपचार दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात दीड लाखापर्यंतचा खर्च केला जाणार आहे. त्यापेक्षाही अधिकच्या खर्चाला मान्यता देण्यात येणार आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील इतर खासगी रुग्णालयांनाही यात समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुरेंद्र इरपनवार, जिल्हा समन्वयक जनआराेग्य याेजना