नेर : पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लावलेली रोपं जगली की नाही याचे मूल्यमापन होत नाही. कोट्यवधी रुपयांच्या रोपट्यांचा चुराडा होत आहे. वृक्ष लागवड आता केवळ कागदावरच दिसत आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.शासनातर्फे गावपातळीवर अनेक योजना राबविल्या जातात. काही योजना गावापर्यंत पोहोचतात तर काही कागदोपत्रीच दिसतात. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची पातळी कमालीची घटत चालली आहे. यावर उपाय म्हणून शासनाने वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, निमशासकीय संस्था यासह विविध शासकीय कार्यालयांना दरवर्षी वृक्षारोपणाचे निर्देश दिले जाते. यानुसार पावसाळ्यात वृक्ष लागवड होते. मात्र ही केवळ औपचारिकता ठरत आहे. वृक्षारोपणासाठी शासनाने गावपातळीवर नर्सरी दिली. त्यात अनेक वृक्षांची रोपटी लावली जातात. तेथून आणलेली रोपटी गावागावात लावल्यानंतर त्याच्या संगोपनाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. लावलेले रोपटे जिवंत आहे की वाळले याची पाहणी कधीही केली जात नाही. दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण होत असल्याचा प्रकारही घडतो. ‘झाडे लावा - झाडे जगवा’ हा संदेश गावागावात पोहोचविला जातो. शाळकरी विद्यार्थी, युवा वर्ग आदींच्या पुढाकारात वृक्षारोपण केले जाते. मान्यवर मंडळी आणि अधिकारी वृक्षारोपण करतात पण, या वृक्षांचे पुढे काय झाले याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. यातूनच वृक्ष लागवड कागदावर दिसण्याचे प्रकार वाढले आहे. ही योजना नेमकी कुणाच्या फायद्याची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लावलेल्या झाडांचा अहवाल सचित्र वरिष्ठांकडे पाठविला जातो. प्रत्यक्षात २५ टक्केही रोपं अस्तित्वात राहात नाही, हे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)
वृक्ष लागवड कागदावरच
By admin | Published: November 03, 2014 11:33 PM