लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेंतर्गत पुसद वन विभागाला १८ कोटी ७६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वृक्ष महोत्सवांतर्गत लोकसहभागातून या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे (आयएफएस) यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.शासनाने राज्यात शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत २०१७ च्या पावसाळ्यात चार कोटी आणि २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्षांची राज्यात लागवड करण्यात आली. आता २०१९ मध्ये पावसाळ्यात शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यात पुसद वन विभागाला १८ कोटी ७६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.विभागातील पुसद, दिग्रस, मारवाडी, काळी (दौ), उमरखेड, महागाव आणि शेंबाळपिंपरी या सात वन परिक्षेत्रात त्यासाठी ३३ रोपवाटिका निर्माण करण्यात आल्या. या रोपवाटिकेतील रोपटी सातही वन परिक्षेत्रांना वाटून देण्यात आली. वृक्ष लागवडीची सर्व माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. याशिवाय वृक्ष लागवड कार्यक्रमात पारदर्शकता असावी म्हणून सर्व माहिती डिजीटल प्लॅटफॉर्मवरही टाकण्यात आली. पुसद वन विभागात एकूण ३३ रोपवाटिकांमध्ये साग, सीताफळ, चिंच, आवळा, करंज आदी प्रजातींची २२ कोटी २९ लाख रोपटी उपलब्ध आहे. याच रोपट्यांमधून १ जुलैपासून वृक्ष महोत्सवांतर्गत वृक्ष लागवड केली जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनासह विविध सामाजिक संघटनांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.नागरिकांनी मोहिमेत सहभाग नोंदवावावृक्ष लागवड कार्यक्रम केवळ वन विभागापुरताच मर्यादित न राहता त्यात सामाजिक व सहकारी संस्था, शालेय शिक्षण विभाग आणि इतर यंत्रणांनी सहभाग नोंदवावा म्हणून शासनाने आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीच्या बैठका घेण्याचे निर्देश वन विभागाला दिले. त्यानुसार पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव या चार तालुक्यांमध्ये बैठका घेण्यात आल्या. आता पावसाळ्यात वृक्ष लागवड कार्यक्रमात शासकीय यंत्रणेसह विविध सामाजिक संघटना व सर्व जनतेनेही सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे (आयएफएस) यांनी केले आहे.
पुसद विभागात वृक्ष लागवड उद्दिष्ट १८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 10:01 PM
शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेंतर्गत पुसद वन विभागाला १८ कोटी ७६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वृक्ष महोत्सवांतर्गत लोकसहभागातून या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
ठळक मुद्दे३३ रोपवाटिका : १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वृक्ष महोत्सव, सात वनपरिक्षेत्रात होणार वृक्षारोपण