‘एटीसीं’चा दावा ८० टक्क्यांचा : तीन शाळांना भेट देऊन पाहणीयवतमाळ : विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शिक्षक व संस्थानिकांची धावाधाव सुरू असली तरी आतापर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच विद्यार्थी आदिवासी आश्रमशाळांमध्ये परतले आहे. मात्र संस्थांकडून हा आकडा फुगवून दुपटीने सांगितला जात आहे. दरम्यान अमरावतीचे आदिवासी विकास अपर आयुक्त भास्कर वाळींबे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील तीन शाळांना भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांचे वास्तव स्टिंग आॅपरेशनद्वारे ‘लोकमत’ने उघड केले होते. २६ जूनला सर्व शाळा उघडल्या. त्यावरून तीन आठवडे लोटूनही आदिवासी आश्रमशाळा बंद अवस्थेत व विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पुढे आले होते. त्याची दखल घेत पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रुमाले यांनी या शाळांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथक गठित केले. या पथकाला चार दिवसात अहवाल मागण्यात आला. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे आश्रमशाळांची यंत्रणा विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी कामाला लागली आहे. संस्थानिक व शाळेचे शिक्षक, कर्मचारी गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत आणत आहेत. पालकांना विनवण्या करीत आहेत. त्यानंतरही आजच्या घडीला अवघे ३० ते ४० टक्के विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचल्याची माहिती आहे. परंतु आश्रमशाळांचे संचालक हा आकडा फुगवून सांगत आहे. खरोखरच आश्रमशाळेत किती विद्यार्थी हजर आहेत, हे तपासायचे असेल तर सकाळच्या जेवणाच्या वेळी बसणाऱ्या पंगतीत ते सहज तपासणे शक्य होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने अशा पंगतींचेही वास्तव टिपले असता ३० ते ४० टक्क्याचा आकडा पुढे आला. दरम्यान, अमरावतीचे आदिवासी विकास अपर आयुक्त भास्कर बाळींबे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील तीन शाळांना अकस्मात भेट देऊन पाहणी केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांची लासीना येथील अनुदानित आश्रमशाळा तसेच बाभूळगावची शाळा व कापरा येथील शासकीय आश्रमशाळेत भेट देण्यात आली. या शाळांमध्ये ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचा दावा वाळींबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. या शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती, दहावी-बारावीचे निकाल, इमारत बांधकाम, प्रसाधनगृह व अन्य व्यवस्था पाहता आपण समाधानी असल्याचे बाळींबे यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू झाल्यानंतर किमान एक महिना तरी आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये पूर्ण संख्येने परतत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावेळी त्या तुलनेत विद्यार्थी लवकर शाळेत पोहोचल्याचे वाळींबे म्हणाले. विद्यार्थी उपस्थित नसतील त्या महिन्यातील अनुदानाची रक्कम आश्रमशाळांना दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)
आदिवासी आश्रमशाळांमध्ये ४० टक्केच विद्यार्थी परतले
By admin | Published: July 19, 2014 1:48 AM