सव्वाशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा : सागवान तस्करीचा संशय, अनेक घरांची झडतीयवतमाळ : सागवान तस्करीसाठी कुख्यात असलेल्या येथील गवळीपुऱ्यात वन विभागाच्या सव्वाशे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी धाडसत्र राबवून अनेक घरांची झडती घेतली. या मोहिमेत केवळ ८० हजार रुपयांचे सागवान जप्त झाले असले तरी सागवान तस्करांमध्ये मात्र प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. यवतमाळ शहराच्या इतिहासात वनविभागाने पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केली असावी. यवतमाळ शहरातील तलावफैल परिसरातील गवळीपुरात सागवान तस्करी होत असल्याचा संशय गेल्या कित्येक महिन्यांपासून वन विभागाला होता. लगतच्या जंगलातून तोडून आणलेल्या सागवानाची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती सीसीएफ जी.टी. चव्हाण यांना मिळाली. त्यांच्या माहितीवरून व वनसंरक्षक सोनोने यांच्या मार्गदर्शनात अत्यंत गोपनीयता बाळगून ही मोहीम आखण्यात आली. त्यावरूनच गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वन विभाग आणि पोलिसांची एकापाठोपाठ एक नऊ वाहने या परिसरात धडकली. या वाहनातून वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक असा तब्बल ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा दाखल झाला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या नेतृत्वात १४ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि चार्ली पथकही पाठोपाठ येथे दाखल झाले. उपवनसंरक्षक गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनात धाडसत्र सकाळी १०.३० वाजता सुरू झाले. गवळीपुऱ्यात वन विभाग आणि पोलिसांचा एवढा मोठा ताफा पाहून प्रचंड खळबळ उडाली. या पथकातील अधिकाऱ्यांनी सागवान तस्करीचा संशय असलेल्या अनेक घरांची झडती घेतली. तब्बल दीड तासांच्या धाडसत्रानंतर दोन ठिकाणावरून ७० ते ८० हजार रुपयांचे दोन घनमीटर अवैध सागवान आढळून आले. या पथकाने परिसरातील कच्ची घरे आणि तलावाच्या काठावरही शोध घेतला. विशेष म्हणजे या सर्व धाडसत्राचे दोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात आले. यवतमाळ शहराच्या इतिहासात वनविभागाने एवढी मोठी कारवाई केल्याची ही पहिलीच घटना असावी. पोलिसांच्या कोम्बींग आॅपरेशनचा अनुभव असलेल्या यवतमाळकरांना पहिल्यांदाच वनविभागाची ही मोहीम अनुभवायास मिळाली. एवढा मोठा ताफा बघितल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)
वनविभागाचे गवळीपुऱ्यात धाडसत्र
By admin | Published: April 07, 2017 2:19 AM