यवतमाळ : धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. या विचित्र अपघातात ट्रकची धडक बसून तरुण ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील देवधरी घाटात घडली. रवींद्र माणिकराव मेश्राम (३०, रा. देवधरी, ता. राळेगाव) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर चालक पळून गेला.
ट्रक क्रमांक (पीबी १०, एचएस ७१९७) हा हैदराबादकडून नागपूरकडे जात होता. देवधरी घाट उतरताना या ट्रकचे समोरील एक चाक निखळल्यामुळे संतुलन बिघडले. त्याचवेळी पायी निघालेल्या रवींद्र मेश्राम याला ट्रकची धडक बसली. त्यात तो रस्त्याच्या बाजूला पाच ते दहा फूट फेकला गेला. या प्रकारानंतर ट्रक दुभाजकावर धडकून उलटला.
या अपघाताची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी पोहोचले. रवींद्रला उपचारासाठी करंजी येथे नेण्यात आले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार विलास जाधव, विक्की धावर्तीवार करत आहेत.