यवतमाळ : राणी अमरावती- आलेगाव रस्त्यावर सतरा बैल कोंबून भरलेला ट्रक पोलिसांनी रविवारी पहाटे ५.३० दरम्यान पाठलाग करून ताब्यात घेतला. या पोलीस ठाण्यांतर्गत दोन आठवड्यांतील ही दुसरी कारवाई आहे.
एमएच ३२ सीक्यू ७२७९ क्रमांकाचा ट्रक बाभूळगाव बसस्थानकावरून सुसाट वेगाने यवतमाळकडे जाताना गस्तीवरील निरीक्षक मंगेश डांगे यांना दिसला. थांबण्याचा इशारा केल्यानंतरही तो भरधाव निघाला. याची माहिती यवतमाळ नियंत्रण कक्षाला देऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. ताडपत्री झाकून असलेला हा ट्रक राणीअमरावती गावाजवळील वेरुळा नदीवरील पुलावर उभा असलेला आढळून आला. चालक व सोबत असलेला, असे दोघेही पसार झाले होते.
ट्रकमधील पाच बैल मृतावस्थेत आढळले. ट्रकसह १३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, निरीक्षक मंगेश डांगे, पोलीस शिपाई रवींद्र इरटकर, संजय कोहाड यांनी पार पाडली. सर्व गोवंश सरूळ येथील गोरक्षणात पाठविण्यात आले. गोरक्षणात चाऱ्याची टंचाई भासत असल्याचे सांगितले जाते.