यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील करंजी आणि पांढरकवडा येथे मंगळवारी झालेल्या दोन अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला. वरोऱ्यावरून पांढरकवडा येथे वृत्तपत्राचे गठ्ठे घेऊन निघालेली ओमनी गाडी करंजीनजीक असताना भरधाव ट्रकने ठोकरले. हा अपघात सकाळी ६:१५ च्या सुमारास घडला. तर पिंपळखुटी येथील नाक्यासमोर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला.
वरोरा येथून वृत्तपत्राचे गठ्ठे घेऊन निघालेली ओमनी (एम.एच.३४-के. १९५४) करंजीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राज्य महामार्गावरील कोठोडा गावालगत पुलावर आली असता त्याचवेळी भरधाव वेगात ट्रक आला. या ट्रकने ओमनीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात तिघे ठार झाले असून एकजण गंभीर आहे. त्याच्यावर यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती ओमनी वणी, मारेगावमार्गे करंजीकडे येत असताना ही दुर्घटना घडली.
कारचालक किशोर पंजाबराव बोरकर (वय ५०), रा. आनंद चौक, वरोरा (जिल्हा चंद्रपूर), पुरुषोत्तम विठ्ठल नारायणे (५०), रा. इंद्रायणीनगर वरोरा, रतन तुळशीराम खोडेकर रा. डिगडोह (ता. राळेगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर निकेश हसन आत्राम (१९), रा. चंदनखेडा (ता. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर) असे जखमीचे नाव आहे. निकेशची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
जेसीबीद्वारे मृतदेह काढले बाहेर
हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, परिसरातील नागरिक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धडक बसल्यानंतर ओमनी कारचा समोरील भाग चक्काचूर झाला होता. त्यामुळे मृतांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.
अपघातानंतर ट्रक चालक पसार
अपघातानंतर अज्ञात वाहनाच्या चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पोबारा केला. पांढरकवडा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्या ठिकाणी अपघात घडला, त्या पुलाजवळ रस्ता दबलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा भरधाव वाहन उसळते. अशातूनच हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
अशी पटली जखमीची ओळख
अपघातग्रस्त ओमनी कारमध्ये चालकासह चारजण होते. अपघात घडल्यानंतर जखमी निकेश आत्राम याची ओळख पटत नव्हती. मात्र, त्याच्या खिशात शाळा सोडल्याचा दाखला आढळून आला. या दाखल्यावरून त्याची ओळख पटविण्यात आली.
ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
मंगळवारी ४ वाजेच्या सुमारास पाटणबोरी येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. पिंपळखुटी येथील वनविभागाच्या नाक्यासमोर ही घटना घडली. आकाश यादव आत्राम (२८), रा. कारेगाव बंडल व कैलास भीमराव जुमनाके (२५), रा. साखरा (ढोकी) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे पाटणबोरी येथे दुचाकी (क्रमांक एम. एच. २९, बीके ९२८५) ने बाजारासाठी आले होते. परत जात असताना हैदराबादवरून टोमॅटो घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक एपी ३९, यूडी १५९९) आकाशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. आकाश अविवाहित असून कैलासचे लग्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. घटनेचा तपास एपीआय वसंता चव्हाण, जमादार भगत व शिपाई किशोर आडे करीत आहेत.