लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठीच आपण या पदावर रूजू झालो. प्रत्येकाला न्याय मिळेल, फक्त पोलिसांवर विश्वास ठेवा. आपल्या हद्दीतील पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास सरळ माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी मंगळवारी येथे केले. वणी पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.आगामी पोळा, गणेशोत्सव, मोहरम, नवरात्रोत्सवात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाला आपल्या सहकार्याची साथ असावी, असेही ते यावेळी म्हणाले. येथील पोलीस वसाहत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी दिली. तसेच येथील वाहतूक शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता, शहरातील अत्यंत संवेदनशील चौकात असणाऱ्या चौक्या व बिट पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शहरात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात असून चौकाचौकांत ठिय्या मांडून बसत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली. यावर नुरूल हसन यांनी मोकाट जनावरांचा प्रश्न हा जिल्ह्यातच असून याबाबत त्या-त्या ठिकाणातील न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना माहिती देवू, त्यांनी लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी यांची मदत घेऊन ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.वणी वाहतूक उपशाखेकरिता २० होमगार्ड व पोलीस ठाण्याकरिता २० होमगार्ड, असे एकूण ४० होमगार्ड लवकरच स्थायी स्वरूपात नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय असून समाधानकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांवर विश्वास ठेवा, प्रत्येकाला न्याय मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:27 PM
आपल्या हद्दीतील पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास सरळ माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी मंगळवारी येथे केले.
ठळक मुद्देनुरूल हसन : वणी पोलीस ठाण्याला अप्पर अधीक्षकांची भेट