ढगाळ वातावरण : कृषी मार्गदर्शनाची प्रतीक्षा, कृषी सहायकांची पावले कधी वळणार?प्रवेश कवडे हरदडासोयाबीन आणि कापसाने दगा दिला. सर्व आशा तूर पिकावर होत्या. मात्र त्यावर रोगाने आक्रमण केले. आधीच चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाण्याची भीती आहे. तूर हातातून गेल्यास वर्षभर कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, प्रासंगिक खर्च करायचे कसे याची काळजी त्यांना लागली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही कृषी विभागाकडून कुठलेही मार्गदर्शन होत नाही. या विभागातील अधिकारी वा कर्मचारी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचण्याची तसदी घेत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उशिराचा पाऊस, बराच काळपर्यंत दडी आणि आवश्यक त्यावेळी पावसाची माघार या कारणामुळे सोयाबीन आणि कापूस हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सोयाबीनला पाण्याची गरज असताना वरुण राजा बरसला नाही. त्यामुळे बळीराजाची सर्व भिस्त तूर पिकावर आहे. आता या पिकावर ढगाळ वातावरणामुळे अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. या स्थितीत काय उपाययोजना करायला पाहिजे, याविषयीचे मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. प्रत्यक्षात यावर्षी तुरीचा पेरा कमी आहे. त्यातही वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तूर काढणीवर येण्यासाठी बराच कालावधी आहे. फुलोऱ्यावर असलेल्या तुरीवर मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने फुलांची गळती वाढली आहे. यावर नियंत्रण न आणल्यास संपूर्ण तूर पीक हातची जाण्याची चिन्हे दिसत आहे. गेली दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. हा काळ तूर पिकासाठी लाभदायक आहे. पण, कीडींचा प्रादुर्भाव धोक्याचा ठरत आहे. कृषी विभागाचे कृषी सहायक, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची पावले शेतापर्यंत वळावी, अशी अपेक्षा मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना आहे.
तुरीवर रोग, शेतकरी चिंतातुर
By admin | Published: November 22, 2015 2:33 AM