लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा करावी लागली. अद्याप जोरदार पाऊस येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने या शेतकºयांना आता तिसऱ्यांदा पेरणी करावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी मृग नक्षत्रावर पहिल्यांदाच जोरदार पावसाने हजेरी लावली. तत्पूर्वी यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यातच मृग नक्षत्रावर पावसाने हजेरी लावल्यामुळे हवामान खात्यावरील विश्वास दुनावला. त्यामुळे उपविभागातील अनेक शेतकऱ्यांनी ८ ते १० जून या दरम्यान शेतात कपाशी, तूर व सोयाबीनची लागवड केली. वातावरण पावसाळीच असल्याने ११ जूननंतरही अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली. मात्र इथेच घात झाला. १० जूननंतर पावसाने चांगलीच दडी मारली. या भागात गेल्या १५ दिवसांपासून अद्याप सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस, तर काही भागात पावसाची दडी, अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी ७ ते १० जूनपर्यंत पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांची पिके अद्यापही तग धरून आहेत. जमिनीत काहीसा ओलावा असल्याने ही पिके वाढत आहे. मात्र ११ जूननंतर पेरण्या झालेली पिके उगवलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्याहीउपरांत जोमदार पाऊस न झाल्याने आता ही दुबार पेरणीही धोक्यात आली असून तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. आजपर्यंत वणी तालुक्यात केवळ १८६ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.पावसाअभावी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भावखंडित पावसामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. वणी, झरी व मारेगाव या तीन तालुक्यात काही ठिकाणी कपाशीवर लष्करी अळीच प्रादूर्भाव दिसून आला. जवळपास प्रत्येकच शेतांमध्ये देवगायींचा (तेलण्या) प्रकोप वाढला असून य देवगायी तूरी व कपाशीची पाने कुरतडून खात आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी शेतांमध्ये थिमेटचा वापर करीत आहे. मात्र तरीही तेलण्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
उपविभागावर तिबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 10:24 PM
१२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा करावी लागली.
ठळक मुद्देखंडित पावसाचा परिणाम : हवामान खात्याचे अंदाज खोटे, शेतकरी अडचणीत