सरूळ परिसर : जनावरांचाही जीव टांगणीला, चाऱ्याचा प्रश्न, काय पेरावे याची चिंतासरूळ : परिसरात दुबार पेरणीही उलटल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शिवाय चारा नसल्याने जनावरांचाही जीव टांगणीला लागला आहे. परिसरात कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजाला आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पाण्याचे स्रोतही आटत चालल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परसोडी, घारफळ, शिंदी, पाचखेड, वरूड, रेणुकापूर, येरणगाव, सारफळी, गवंडी, खर्डा, कोल्ही-बारड, फाळेगाव, बागवाडी, महंमदपूर आदी गावातील शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे संकट आहे. मृगाच्या पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी बियाणे टोबले. अंकुरलेले बियाणे पावसाअभावी कोमेजले. यानंतर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र मेघराजाने हुलकावणी देत शेतकऱ्यांच्या स्वप्नांची होळी केली. परिसराच्या डझनावर गावातील शेतकऱ्यांपुढे मेघराजा आपत्ती घेवून उभा ठाकला आहे. शेतात महागडी बियाणे पेरली. यासाठी बँकांचे कर्ज घेतले. दुबार पेरणीसाठी घरातील दागदागिने मोडले. यातही बळीराजाला जबर फटका बसला. पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीही उलटली. आता त्याच्यापुढे तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यासाठी पैसा आणायचा कोठून याची चिंता त्यांना सतावत आहे. बँकांचे कर्ज घेतले. घरातील दागदागिने मोडले. आता त्यांच्यापुढे सावकार हाच एक पर्याय शिल्लक राहिला आहे. अशा स्थितीत शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा आहे.परिसरातील जनावरांना तृष्णा भागविण्यासाठी पाणी नाही. शिवाय वैरणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. या दोनही समस्यांमुळे जनावरांचा जीव टांगणीला लागला आहे. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी परिसरातील गावागावात धोंडी, जलाभिषेक, पूजा-अर्चा, पारायण, महापंगत आदी कार्यक्रम घेतले जात आहे. त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पेरणीसाठी शासनाकडून मदतीची गरज आहे. (वार्ताहर)सावळीसदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळी-पळशी सर्कलमधील जवळपास २७ गावांमधील शेतकरी पावसाअभावी अडचणीत आले आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी १५ जूनपूर्वीच खरिपाची पेरणी केली. महागडे बियाणे शेतात टाकले. मात्र पावसाअभावी मातीमोल झाले. काही ठिकाणी कपाशीचे बियाणे निघालेच नाही. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. यासाठी शासनाने आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)खैरी : पावसासाठी साकडेखैरी : गुरूपौर्णिमेनिमित्त ग्रामवासीयांनी पावसासाठी मारूतीला साकडे घातले़ महापूजा, अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ पावसाळ्याची नक्षत्रे सुरू होऊन महिना लोटला मात्र फक्त दोन पाऊस आले़ त्यामुळे शेतजमीन अजुनही कोरडीच आहे़ काही शेतकऱ्यांनी कोरड्यातच सरकीची टोबणी केली तर बहुतांश शेतकरी पाण्याची वाट बघत आहे़ या परिसरातील ८० टक्के पेरण्या उलटल्या व दुबार पेरण्या करून नजरा आता आकाशाकडे लागल्या आहे़ या परिसरात कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जाते़ पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांना सतावून सोडत आहे़ तिन ते चारही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे़ एकीकडे बियाणाचा तुटवडा आहे़ तर बियाणाचे भाव चढत आहे़ या चक्रव्युहात बळीराजा भरडला जात आहे़ ग्रामस्थांनी बजरंगबलीकडे पावसासाठी साकडे घातले़ त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़ यावेळी पुंडलीक महाजन, जनार्धन वानखडे, श्रीधर पांगुड, नथ्थु वरटकर, शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते़ (वार्ताहर)
तिबार पेरणीचे आर्थिक संकट
By admin | Published: July 14, 2014 1:37 AM