यवतमाळ : यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, महावितरण कंपनीच्या तुघलकी कारभारामुळे पाणी असूनही ते शेताला देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यातून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात विजेची वाट पाहण्यातच शेतकऱ्यांचा दिवस निघून जातो, अशी स्थिती आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचा कारभार मोठ्या प्रमाणात ढेपाळला आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य त्रस्त आहेत. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करूनही उपाययाेजना केली जात नसल्याने शेतकऱ्यांनी आता दाद मागायची तरी कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.
पुसद : शेतकरी राजा अस्मानी संकट व सुलतानी संकटाच्या आपत्तीचा सामना करीत आहे. मात्र, महातविरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. काही दिवसांपासून परिसरात किरकोळ कामासाठी महावितरण वीजपुरवठा कधीही खंडित करीत आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी परतीच्या पावसाने शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यात महावितरण दुरुस्तीच्या नावावर ग्रामीण भागात दोन दिवस किरकोळ कामासाठी वीज पुरवठा खंडित करीत असल्याने शेतकऱ्यांचे, मजुराचे मोठे नुकसान होत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने परीसरातील शेतकरी व शेतमजूर दोन दिवस बसून राहत आहे. सोयाबीन काढणी रखडली अहे. शेतकऱ्यांनी महावितरणच्या गलथान कारभारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल उपस्थित केला आहे.
बिबट्याच्या धाकापोटी रात्रीच्या वेळी शेतकरी बांधव कृषी पंप बंद ठेवतात. दिवसाच्या वेळी सोयाबीनसह इतर पिकांना सिंचन करतात. शिवारात विजेचा खांब पडला म्हणून त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरणला तब्बल दोन दिवस लागले. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन काढणी खोळंबली आहे.
प्रश्न जैसे थे; कर्मचारी जातात तरी कुठे?
विजेचा शेतीसाठी सलग वीज पुरवठा होत नाही. किरकोळ कारणाने दिवसभर वीज खंडित राहते. ग्रामीण भागात वीज पुरवठा अनियमितपणे असतो. पुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार करूनही कर्मचारी वेळेवर येत नाहीत. तालुक्याची सिंचन क्षमता जवळपास ७० हजार हेक्टर आहे. परंतु महावितरणच्या कारभारामुळे सिंचनावर संक्रांत आल्याची स्थिती आहे.
'तो' अधिकारी कोण
वीज कंपनीत नुकताच एक अधिकारी बदलून आला आहे. जिल्ह्यात येण्यासाठी त्याने काही लाख रुपये मोजल्याची कुजबूज असून तो आल्यापासूनच जिल्ह्यातील कारभार ढेपाळल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.
जिल्ह्याला यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. यात शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता पाणी उपलब्ध असूनही वीज कंपनीच्या कारभारामुळे ते शेतीला देता येत नाही. या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कापसावरच शेतकऱ्यांची भिस्त; त्यालाही पाणी देता येईल
वणी तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने तहानलेल्या पिकांना पाणी द्यायचे तरी कोठून, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. लोडशेडिंगच्या नावाखाली तासनतास शेतीचा वीज पुरवठा खंडित ठेवला जातो. वणी तालुक्यातील अनेक भागात ही समस्या निर्माण झाली असून शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यासंदर्भात तक्रार केल्यास वीज कर्मचारीदेखील वेळेवर दुरुस्तीसाठी पोहोचत नाहीत. वणी तालुक्यात तूर, कापूस आणि सोयाबीन ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत. यंदा मात्र सोयाबीन पिकावर यलो अटॅक केल्यामुळे उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. आता सर्व भिस्त कापसावर आहे आणि कापसाला सिंचनाची गरज आहे.
परंतु, विजेच्या खेळखोळंब्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण होत चालले आहे. वणी तालुक्यात ६१ हजार २३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्यापैकी केवळ १८ हजार ९०० हेक्टर ओलीत आहे. उर्वरित सर्व जमिनीवर कोरडवाहू पिके घेतली जातात. या प्रकरणाकडे लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा विजेच्या गंभीर प्रश्नामुळे आत्महत्येच्या घटनेत पुन्हा वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुख्यालयी कर्मचारीच दिसेना
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज कंपनीविरोधात संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात कर्मचारी नसतात, मुख्यालयही ते दिसत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत.