महागाव : महावितरण कंपनीच्या मनमानी व तुघलकी कारभारामुळे उमरखेड, महागाव व पुसद विधानसभा क्षेत्रातील जनता कमालीची त्रस्त आहे. लोकप्रतिनिधींना या समस्येकडे लक्ष देण्यास सवड मिळत नाही.
पुसद, उमरखेड, महागाव या तीन तालुक्यातील कृषिपंप, घरगुती वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी केली आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे अनेक गावांचा पाणी पुरवठा बंद पडून नागरिकांना नदी, नाल्यांचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. कृषिपंपाची वीज गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे.
सध्या शेतकऱ्यांनी पैशांची कशी तरी जुळवाजुळव करून शेती केली. त्यात महावितरणच्या मनमानीमुळे पिके वाळून जात आहेत. शेजारील तेलंगाणा राज्यात शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज मिळत असताना आपल्याकडे मात्र दहा ते १५ तास भारनियमन केले जाते. उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रायलात ऊर्जामंत्री व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेउन पाणी पुरवठा, पथदिव्यांचे तोडलेले कनेक्शन पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले. मात्र, महावितरण वीज कनेक्शन कापत आहे. यामुळे शेतकरी व नागरिक कमालीचे त्रासले आहेत. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी अपेक्षा पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी व्यक्त केली.
कोट
विजेच्या सर्व ग्राहकांकडून २७ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. विजेचा वापर सर्वांकरिता अत्यावश्यक आहे. परंतु बिल कोणी भरत नाही. त्यामुळे थकीत वीज बिलाची रक्कम वाढत आहे. ग्राहकांनी बिल भरून कंपनीला सहकार्य करावे.
विनोद चव्हाण,
सहाय्यक कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, महागाव