लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : साडेतेरा वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामुळे एकेकाळी राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात यावेळी भाऊबंदकीत लढत होत आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य अॅड. नीलय नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक या दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये ही थेट लढत होत आहे.नाईक बंगल्याच्या एकजुटीला सुरुंग लागल्याचे दुर्दैवी चित्र पाहण्याची वेळ पुसदचे मतदार आणि तमाम बंजारा समाज बांधवांवर आली आहे. कधी काळी एकाच बंगल्यात राहणारे दोन भाऊ समोरासमोर उभे ठाकल्याने नेमकी कुणाला पसंती द्यावी असा पेच समाज बांधव व मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र बंजारा समाजाच्या आमदारांची संख्या कमी होऊ नये हा सर्वसमावेशक सूर ऐकायला मिळतो आहे. नीलय नाईक निवडून आल्यास पुसदचे एका आमदाराचे नुकसान होणार आहे.पुसदला अॅड. वजाहत मिर्झा यांच्या रुपाने काँग्रेसकडेही विधान परिषद सदस्य आहे. त्यामुळे पुसदच्या आमदारांची तीन ही संख्या कायम ठेवावी असा विचारप्रवाह आहे. परंतु त्याला सुशिक्षित मतदार कितपत साथ देतात हे पाहणेही महत्वाचे ठरते.नीलय नाईकजमेच्या बाजूबंगल्यातून बाहेर पडून केलेले उघड बंड, त्याला भाजपने विधान परिषदेची संधी देऊन दिलेली भक्कम साथ, बंगल्याच्या विरोधातील घटकांना मिळालेला सक्षम पर्याय, उच्चशिक्षित-सोबर चेहरा, मतदारसंघातील सुशिक्षितांची मिळालेली साथ, आमदारकीचे वजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अनुभव, थेट मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक, नातेसंबंधात अडकून न राहता घेतलेली उघड विरोधाची भूमिका.उणे बाजूनाईक बंगल्याच्या विरोधात जाऊन घेतलेली भूमिका बहुतांश समाज बांधवांना न आवडणे, कौटुंबिक विरोधी विचारसरणीशी केलेली जवळीक, शिवसेनेचा मतदारसंघावरील दावा मोडित काढल्याने शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी, थेट वरून आमदारकी आणल्याने भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा असलेला विरोध, सामान्य नागरिकांकडून राखला जाणारा दुरावा, केवळ प्रतिष्ठीतांचे पाठबळ.
इंद्रनील नाईकजमेच्या बाजूवसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक यांच्यानंतर नाईक बंगल्याचा वारसदार, उच्च शिक्षित नवा चेहरा, नाईकांचा व पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला, वर्षानुवर्षे परंपरागत मतदार, कुटुंबाचे ५० वर्षातील राजकीय योगदान, त्यातून जपलेली, विकसित केलेली सामाजिक बांधिलकी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदाराचा गृहतालुका, त्यांची मिळणारी साथ, तरुणांचे पाठबळ.उणे बाजूशिवसेनेतील पक्षांतराच्या चर्चेने राष्ट्रवादी काँग्रेसमधील निष्ठेला गेलेला तडा, अखेरच्या क्षणी पक्षांतराचा निर्णय बदलवून केलेली सारवासारव, वडील आमदार व आई नगराध्यक्ष असूनही पुसद शहराची कायम असलेली बकाल अवस्था, न झालेली विकास कामे, काँग्रेसच्या गोटात असलेली नाराजी, राष्ट्रवादीच्या प्रमुख चेहऱ्यांनी भाजपची धरलेली कास, जनतेत नसलेला फारसा संपर्क, बहुतांश मुंबईतील वास्तव्य.