लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील तमाम ठाणेदारांना सर्व प्रकारचे अवैध धंदे तत्काळ पूर्णत: बंद करण्याचे फर्मान सोडले आहे.गृहराज्यमंत्र्यांनी मुंबईत राज्यातील सर्व परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आणि महासंचालक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांची ४ आॅक्टोबर रोजी बैठक घेतली. मटका, जुगार, अवैध दारू, कोंबडबाजार, अवैध प्रवासी वाहतूक, प्रतिबंधित गुटखा, अवैध सावकारी, क्रिकेट सट्टा, जनावरांची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची तस्करी, भेसळ, गांजा, अफू, चरस या सारख्या अंमली पदार्थांची तस्करी आदी सर्व अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. त्याच्या निरीक्षणाची जबाबदारी पोलीस महानिरीक्षकांवर सोपविण्यात आली. गृहराज्यमंत्र्यांच्या या आदेशाची यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवार ५ आॅक्टोबरपासूनच अंमलबजावणी सुरू झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी स्वत: अवैध धंदे बंद करण्याबाबत सर्व ठाणेदारांना सूचनापत्र पाठविले आहे. शिवाय बिनतारी संदेश यंत्रावर एकाच वेळी सर्व ठाणेदारांशी संवादही साधला आहे. अवैध धंदे पूर्णत: बंद करा, बाहेरील पथकाची धाड यशस्वी झाल्यास तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही, बदलीच नव्हे तर तुमचे निलंबनही होईल, अशा शब्दात एसपी एम. राज कुमार यांनी ठाणेदारांना समज दिली आहे. एसपींनीच अवैध धंद्यांविरोधात बिगूल फुंकल्याने आतापर्यंत पोलीस ठाण्यांच्या आशीर्वादाने उघडपणे चालणारे अवैध धंदे बंद आहेत. मात्र मोबाईल मटका, क्रिकेट सट्ट्यासारखे धंदे चोरट्या मार्गाने सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. धंदे बंद झाल्याने ते धंदेवाईकच नव्हे तर वसुलीसाठी नेमलेली पोलीस यंत्रणाही अस्वस्थ असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.धाडींसाठी पोलिसांची आंतरपरिक्षेत्रीय पथकेमहानिरीक्षक कार्यालयातून धाड पथक निघाल्यास जिल्ह्यातील पोलिसांच्या वसुली कर्मचाºयाला आधीच त्याची खबर लागते. त्यामुळे या पथकाची धाड यशस्वी होते. अमरावतीच्या महानिरीक्षक कार्यालयातून धाडीसाठी येणार असल्यास आपल्याला आधीच अलर्ट मिळतो, असे सांगून येथील वसुली करणाºया पोलीस यंत्रणेकडून अवैध व्यावसायिकांना संरक्षण दिले जात असल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महासंचालक कार्यालयाने आंतरपरिक्षेत्रीय धाड पथके नेमल्याची माहिती आहे. जिल्ह्यात लगतच्या नागपूर, नांदेड येथील महानिरीक्षकांच्या पथकाकडून धाडी घालतल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व अवैध व्यावसायिक सध्या ‘टाईट’ आहे.मुंबईतील मुख्य व्यावसायिकांशी ‘वाटा-घाटी’मटक्याचे आकडे मुंबईतून उघडले जातात. राज्यभरातील मटक्याची सूत्रे मुंबईत एकवटली आहेत. एका राजकीय पक्षाने या सूत्रधारांकडे मटका बाजारातील राज्यभरात होणाºया ‘उलाढाली’च्या अनुषंगाने दरदिवशी एक कोटी व महिन्याकाठी ३० कोटींची मागणी नोंदविल्याची चर्चा स्थानिक मटका व्यावसायिकांमध्ये आहे. त्यातूनच अचानक राज्यभरात वातावरण ‘टाईट’ झाले. अवैध व्यावसायिक व पोलीस यंत्रणेत धडकी भरविण्यात आली. त्याच अनुषंगाने मुंबईत ‘वाटा-घाटी’ सुरू आहे. त्यात यश आल्यास दोन-तीन दिवसात राज्यात अवैध धंद्यांची स्थिती पूर्वीप्रमाणे ‘आलबेल’ होईल, असा दावाही या व्यावसायिकांकडून केला जात असल्याची माहिती आहे.
जिल्हाभरातील अवैध धंदे पूर्णत: बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:45 PM
गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील तमाम ठाणेदारांना सर्व प्रकारचे अवैध धंदे तत्काळ पूर्णत: बंद करण्याचे फर्मान सोडले आहे.
ठळक मुद्देएसपींचे फर्मान : ठाणेदारांना नोटीस, वायरलेसवरूनही सूचना