लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले. ते येथील पंचायत समितीच्या शिवाजी सभागृहात तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.विचारमंचावर उद्घाटक आंबेडकरवादी विचारसरणीचे नेते रणधीर खोब्रागडे, धम्म चळवळीतील कार्यकर्ते अरुणदादा अळणे, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे, स्वागताध्यक्ष प्रा.सुधीर गोटे विराजमान होते. ‘एकच साहेब-बाबासाहेब’ मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेच्या तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाल्यार्पण करुन आणि निळी फीत कापून झाले.संमेलनाध्यक्ष डॉ.अशोक पळवेकर पुढे म्हणाले, या देशात दोन तत्वज्ञान व दोन संस्कृतीतील संघर्ष सतत चालत आलेला आहे. देशातल्या आजच्या राजकारणाने शिक्षण व्यवस्थेसह धर्मकारण, समाजकारणाला आपल्या व्यवस्थेचे बटीक बनवलेले आहे. शोषणाची ही विषमतावादी व्यवस्था मुळासकट उद्ध्वस्त करायची असेल, तर आंबेडकरी माणसाला एक सशक्त अशी राजकीय भूमिका घेणे आवश्यक आहे. आपण राजकीय भूमिका घेतलीच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रातील भूमिकाही मृतप्राय ठरतात. यासाठी डॉ.आंबेडकर यांच्या वैश्विक तत्वज्ञानाशी कायम प्रामाणिक राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. नांदेड येथील पहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रात्री प्रवीण राजहंस आणि संचाचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक मुख्य संयोजक गणेश कांबळे यांनी केले. उद्घाटकीय सत्राचे संचालन शीतल वानखेडे, तर आभार निमंत्रक हेमंत इंगोले यांनी मानले.संमेलनाच्या यशस्वीतेसाठी साहित्य संसदेचे सचिव गंगाधर ढवळे, सहसंयोजक विशाल डाके, प्रशांत धुळे, किशोर भवरे, दिनेश चोपडे, सागर डाके, सोनू वरठी, अंकुश अघम, विक्रांत डाके, शेख महबूब, जाँबाज इराणी, आशिष अघम, अतुल हजारे, अमोल डाके, शेख दिलावर, विपुल भवरे, गाडगे आदी परिश्रम घेत आहे.बाबासाहेबांच्या विचारांची अपरिहार्यतासाहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी ‘समकाळात बाबासाहेबांच्या विचारांची अपरिहार्यता आणि संमेलनाची आवश्यकता’ याबाबत साहित्य संसदेची भूमिका विषद केली. इतर पाहुण्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यांची साहित्य संपदा, त्यांचे विचार आदींवर प्रकाश टाकला.
आधुनिक शोषण व्यवस्था उलथवून टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:30 PM
समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले.
ठळक मुद्देअशोक पळवेकर : पुसद येथे तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे थाटात उद्घाटन