लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दोन वर्षांपासून कोरोनामुळे अभ्यासाचे वांदे झालेले असताना बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे उभी ठाकलेली वार्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. शाळा बंद असणे, ऑनलाईन अभ्यासात नेटवर्क नसणे, शिक्षकांशी अनेक दिवस भेट न होणे, हवे ते पुस्तक वेळेत न मिळणे, परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बस नसणे अशा अनेक अडचणी असतानाही विद्यार्थी लढवैय्या सैनिकांप्रमाणे इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी परीक्षेच्या मैदानात उतरले होते. तब्बल ९९ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. जिल्ह्यातील साडेतीनशे परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजतापासून इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तुरळक घटनांचा अपवाद वगळता पहिला पेपर शांततेत, शिस्तीत आणि लाखखिंडचा अपवाद वगळता काॅपीमुक्त वातावरणात पार पडला. गावातच परीक्षा असल्याने केंद्राबाहेर पालकांची गर्दी दिसली.
विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडले प्रश्नसंच - बारावी परीक्षेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच परीक्षेचा प्रश्नसंच विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीने उघडण्यात आला. बोर्डातर्फे प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्वनियोजनानुसार पेपरचे गठ्ठे पोहोचविण्यात आले होते. पूर्वी हे गठ्ठे शिक्षक उघडून विद्यार्थ्यांना पेपर वाटत होते. मात्र यंदा पेपरचा गठ्ठा परीक्षा वर्गात आणून विद्यार्थ्यांच्या समक्ष, त्यांच्या स्वाक्षरीनिशी उघडले.
आधी परीक्षा तब्येतीची - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा होत असल्याने परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अर्धातास आधी बोलावून सुरुवातीला थर्मल गणद्वारे त्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर फवारण्यात आले. बैठक व्यवस्थाही झिकझॅक पद्धतीने करण्यात आली. वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
प्रत्येक केंद्रावर थेट बोर्डाचा ऑनलाईन वाॅच- शिक्षण विभागाने नेमलेल्या भरारी पथकांनी तसेच बैठ्या पथकांनी परीक्षेवर चोख नजर ठेवली. प्रत्येक केंद्रात दोन पोलीसही तैनात करण्यात आले. मात्र त्यापेक्षाही कठोर नजर बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने ठेवली. पेपर संपल्याबरोबर प्रत्येक केंद्र संचालकांकडून बोर्डाने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या यादीसह पेपर दरम्यानची माहिती मागविली.