पुसद : बारा बलुतेदार व्यावसायिकांचे कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्यामुळे स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्य सरकारने केलेल्या लाॅकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दुकान सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट आदी बारा बलुतेदारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे गरीब स्थितीत असलेला हा समाज अधिकच जास्त आर्थिक अडचणीत आला आहे. या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. न्हावी समाजातील गरिबीमुळे आजपर्यंत ३१ जणांनी आत्महत्या केल्या आहे.
लॉकडाऊन जाहीर करताना ऑटोरिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले व इतर लोकांकरिता आर्थिक सहाय जाहीर केले. परंतु, न्हावी, सुतार, शिंपी, परीट व इतर बारा बलुतेदारांसाठी कुठलेही पॅकेज नाही. राज्यातील बारा बलुतेदारांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून बारा बलुतेदारांमधील परंपरागत व्यावसायिकांना प्रति कुटुंब किमान पाच हजार रुपये आर्थिक सहाय देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
कोरोना रुग्णांच्या बाबतीत बेड उपलब्ध होत नाही. याकरिता कोविड केअर सेंटर तालुकास्थानी सुरू करून कोरोना रुग्णांची व्यवस्था व उपचार कसे चांगले होईल, याबाबतही शासन स्तरावर प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील समदुरकर, महिला जिल्हाध्यक्ष रुपाली जयस्वाल, जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण आगासे, शेखर वानखेडे, रेश्मा लोखंडे, शहर अध्यक्ष संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.