यवतमाळ : जिल्ह्यात एकीकडे नोकऱ्यांचा दुष्काळ पडलेला असताना दुसरीकडे कष्ट उपसणाऱ्यांचा सुकाळ झाला आहे. लाख अडचणी असल्या तरी स्पर्धा परीक्षांमधून यशस्वी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता तर गुणवंत विद्यार्थ्यांनी धुवाधार बॅटिंग सुरू केली आहे. एमपीएससीच्या एकाच परीक्षेतून जिल्ह्यातून तब्बल १२ तरुण एकाच फटक्यात फौजदार झाले आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात एमपीएससी क्रॅक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक गट ब या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. कोविडमुळे परीक्षेचा निकाल येण्यास तब्बल अडीच वर्षांचा विलंब लागला; मात्र देर आए दुरूस्त आए या उक्तीप्रमाणे आता जाहीर झालेल्या निकालात राज्यातील ४९४ उमेदवारांसह जिल्ह्यातील १२ तरुणांनी यश मिळविले आहे.
जिल्ह्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेले हे बाराही तरुण अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. शिवाय जिल्ह्यात यवतमाळ शहर वगळता स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कुठेही अनुकूल वातावरण नाही. अभ्यासिका नाही. हवे ते पुस्तक तातडीने मिळण्याची सोय नाही. या अडचणी असतानाच या बारा विद्यार्थ्यांना चक्क उदरभरणाचीही व्यवस्था स्वत:च करण्याची परिस्थिती होती; मात्र अशाही अवस्थेत त्यांनी परीक्षेची सलग तीन-चार वर्षे तयारी केली. मनाचा समतोल राखून परीक्षा दिली. विशेष म्हणजे, परीक्षेच्या निकालाला तब्बल अडीच वर्षांचा विलंब होत असतानाही धीर सोडला नाही. आता या बाराही तरुणांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. जिल्ह्यातून एकाचवेळी बारा फौजदार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हे आहेत नवे बारा फौजदार
संदीप पाटील अंबोडा (आर्णी), सागर भोकरे यवतमाळ, अनिल थोरात मनपूर (आर्णी), निखिल मेश्राम यवतमाळ, अमित बंडगर आर्णी, शंतनू गजभिये दारव्हा, निखिल धोबे पिंपरी कायर (वणी), शुभम शिंदे उमरखेड, विजय नगराळे पांढरकवडा, विकास आडे मोरवाडी (महागाव), पूजा नैताम यवतमाळ, रोहिणी चवरे महागाव या बारा जणांनी एमपीएससी उत्तीर्ण करून फौजदारपद पटकावले आहे.
वीटभट्टीवर मजुरी करत दिली परीक्षा
आर्णी तालुक्यातील मनपूर येथील अनिल थोरात या तरुणाने अत्यंत गरिबीतून हे यश मिळविले आहे. त्याचे आई, वडील आणि भाऊ वीटभट्टीवर मजुरी करून घर चालवितात. स्वत: अनिलनेही वीटभट्टीवर चिखल तुडविण्याचे काम करीत एमपीएससीची तयारी केली. आता मुलगा फौजदार झाल्याचे कळताच अनिलचे वडील बाबाराव, आई बेबीबाई यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.