वणी : शहरालगतच्या लालपुलिया परिसरातून अडीच लाख रूपये असलेली बॅग लंपास करणाऱ्या टोळीला येथील पोलिसांनी गुरूवारी जेरबंद केले. यात सहा आरोपीेंचा समावेश आहे.गेल्या २८ डिसेंबर २०१५ रोजी एका खासगी कंपनीचे अकाउंटंट अनिल मोतिराम झाडे यांनी आपले कार्यालय बंद करून दोन लाख ५० हजार रूपये बॅगमध्ये टाकले. त्यानंतर एम.एच.४०-क्यू.८५०९ या दुचाकीने ते शैलेंद्र अग्रवाल यांच्याकडे पैसे पोहोचविण्यासाठी निघाले. लालपुलिया परिसरातील महावीर कोल कार्यालयासमोर दोन चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवून अडीच लाखांची बॅग चोरून नेली होती. याबाबत अनिल झाडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून चोरट्यांविरूद्ध भादंवि ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात डी.बी.पथकाने या प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी प्रथम अमर रामलाल कनकुटलावार (२४), रा.दामले फैल वणी याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत सहकाऱ्यांची नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. शैलेंद्र अग्रवाल यांच्याकडे पूर्वी सुपरवायझर म्हणून धनराज बिजाराम धोबे (३५) रा.वरूड, ता.मारेगाव, कार्यरत होता. त्याने प्रमोद रामदास मंथनवार (३४) व राजू श्रीधर घुले (३८) रा.चिखलगाव यांना रोज अकाउंटंट झाडे पैसे नेत असल्याचे सांगितले होते. त्यावरून चिखलगाव येथे श्रीकांत पोचन्ना चुनारकर (२४) रा.दामले फैल, भारत ऊर्फ पिंटू दुर्गन्ना रामगीरवार (२९) रा.गायकवाड फैल, गुरू बबन गज्जलवार (३०) रा.गायकवाड फैल या सर्वांनी एकत्र येऊन पैशाची बॅग लुटण्याचा कट रचला होता. घटनेच्या दिवशी सर्वांनी झाडे यांना अडवून बॅग हिसकून नेली. त्यानंतर अडीच लाख सर्वांनी वाटून घेतले. या प्रकरणात आता भादंवि १२० (ब) कलम वाढविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, एसडीपीओ माधव गिरी, ठाणेदार मुकुंद कुळकर्र्णींच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीपक पवार, डी.बी.चे सुदर्शन वानोळे, साजीद सै.हाशम, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रूपेश पाली, रत्नपाल मोहाडे आदींनी तपास केला. (प्रतिनिधी)
अडीच लाख लुटणारी टोळी वणी पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: May 21, 2016 2:31 AM