५० काऊंटर : गरिबांचा संसार देशोधडीला, पोलीस कारवाई नाममात्रसुरेंद्र राऊत यवतमाळ जिल्ह्यात मटका व जुगाराच्या ५० मटका काऊंटरवर दररोज जवळपास अडीच कोटींची उलाढाल होते. यामुळे गरिबांचे संसार देशोधडीला लागले आहे. मात्र पोलीस प्रशासन केवळ कागदावर कारवाई करण्यात धन्यता मानत आहे. मटका अथवा जुगार अड्यावरील धाडीत कधीच मोठी रक्कम रेकॉर्डवर येत नाही. एवढेच नव्हे तर आत्तापर्यंत एकाही मटका किंगला अटक झाली नाही. अड्ड्यांवरील रोजंदारी कर्मचाऱ्याला अटक दाखवून कारवाईचे रेकॉर्ड व्यवस्थित केले जाते. या मटका व्यावसायीकांकडून दरमहा परंपरागत पद्धतीने स्थानिक पोलीस ठाणे व जिल्हास्तरीय शोध पथकांना मोठी रसद पुरविली जाते. परिणामी मटका, जुगारची केस करा, असा आदेश आल्यानंतर वरिष्ठांकडूनच या व्यवसायीकांना सूचना दिल्या जातात. कारवाईला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अड्ड्यावर तोडफोड करू नये, अशी तंबी दिली जाते. यवतमाळात तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अप्सरा टॉकीज चौकात मटका-जुगार चालतो. धाडीतील जप्तीत ठरावीक रक्कम आणि मटका साहित्य दाखविले जाते. मुख्य मटका मालकाला अभय देऊन रोजंदारी कर्मचाऱ्याच्या नावाने नोटीस बजावण्यात येते. मटक्याची केस लावून घेण्यासाठी चालकांकडून रक्कम मोजली जाते. पोलिसांनाही नियमित हप्ते पोहोचत असल्याने ते मूळ मालकापर्यंत पोहोचण्याची तसदी घेत नाही. याच पद्धतीने अवैध दारू गुत्तेही सुरू आहेत. वरिष्ठांचे आदेश मोडून एखाद्या कर्मचाऱ्याने कारवाई केलीच, तर त्याला तातडीने आॅफिस कामात जुंपले जाते. स्थानिक गुन्हे शाखेतील पथके तर याच कामात व्यस्त आहेत. इतर पथकाने तर कधी यवतमाळ शहराबाहेर पाऊलच टाकले नाही. दोन ठाण्याच्या हद्दीतच खेळ सुरू आहे. त्यांनी अद्याप आपल्या कार्यकक्षा रूंदावलेल्या नाही. त्यांच्याही उपस्थितीत अवैध धंदे जोमाने सुरूच आहेत. मटका-जुगाराचे अड्डे आणि खायवाडांची नावे पोलिसांना माहीत नसावी या विषयीसुद्धा साधारशंका उपस्थित केली जात आहे. ही व्यवस्था नवीन पोलीस अधीक्षक एम. राज कुमार मोडीत काढतील अशी अपेक्षा नागरिकांना आहे. गुटखा तस्करीसाठी ‘एफ अॅन्ड डी’कडे बोट गुटखा तस्करीची माहिती असतानाही कारवाई होत नाही. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अंगुलीनिर्देश केला जातो. भोसा मार्गावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या दारू तस्करीलाही आर्थिक अभय आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला जबाबदार धरून पोलिसांकडून हितसंबध जोपासले जातात. याच अवैध धंद्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अनेक गुन्हेगार यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याने यंत्रणा विकत घेण्याची भाषा बोलत आहेत. मटका-जुगार अड्ड्यांची ठिकाणेयवतमाळ - अप्सरा टॉकीज चौक, पाटीपुरा, कळंब चौक, शारदा चौक, बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन, मोठे वडगाव, आठवडीबाजार, दत्त चौकातील भाजी मार्केटमध्ये मोठा जुगार चालतो. वणी - मच्छी मार्केट, सेतू केंद्रासमोर, बस स्टेशन, फ्रुटमंडी, एका बारसमोर, लालपुलीया यासह तालुक्यातील कायर, घोन्सा येथे काऊंटर आहेत. दारू तस्कराचे रॅकेट मोठे आहे. पांढरकवडा - आठवडीबाजार परिसरात पाच अड्डे, पिंपळखुटी येथे महामार्गावरील देशी भट्टीजवळ, बोरी. मारेगाव - पडके पंचायत समिती क्वॉर्टर, बसस्थानकासमोर, मुकुटबन - देशी भट्टीजवळ, उमरखेड - बसस्थानकासमोर, यवतमाळ रोडवर, तालुक्यात दराटी, बिटरगाव, महागाव - फुलसावंगी, महागाव पुसद - नाल्याच्या काठावर, बंद टॉकीज परिसरात, आर्णी - मच्छी मार्केट, फु्रटमंडी, लाडखेड- बसस्थानकासमोर, बोरी अरब - हॉटेलजवळ, मटन मार्केट परिसरात, बाभूळगाव- सर्वात मोठा अड्डा असून एकच खायवाड बसस्थानक, शहरातील जुनी वस्ती आणि सावरखेड येथे अड्डा चालवितो. कळंब - राळेगाव रोडवर, जोडमोहातील देशी भट्ट्रीसमोर, आठवडी बाजार परिसर, राळेगाव - बसस्थानक व तालुक्यात वाढोणाबाजार, वडकी, घाटंजी - पारवा रोडवर, मध्यवस्ती पिंपळाच्या झाडाखाली, किराणा दुकानाजवळ, नेर - चार प्रमुख अड्डे असून एकच व्यक्ती खायवाड आहे.
मटका-जुगारात दररोज अडीच कोटींची उलाढाल
By admin | Published: February 21, 2017 1:21 AM