लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना व लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांची थंडावलेली आंदोलने आता पुन्हा जोर धरू लागली आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शुक्रवारी देशभरातील तरुण कर्मचाऱ्यांनी अनोखे ‘ट्विटर आंदोलन’ करून शासनापर्यंत आपले म्हणणे पोहोचविले.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच लाखांपेक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याचे संघटनेचे नदिम पटेल, मिलिंद सोळंके, प्रवीण बहादे आदींनी सांगितले. कार्यालयात काम करता-करता हे आंदोलन करण्यात आले हे विशेष.
कर्मचाऱ्यांनी सर्व मंत्र्यांच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करून एकाच वेळी म्हणजे दुपारी १२ ते ३ या वेळात आपल्या मागण्या पोस्ट केल्या. तीन तासात १० लाख पोस्ट असे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यासाठी ‘रिस्टोअर ओल्ड पेन्शन’ असा हॅशटॅग वापरण्यात आला. २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या ऐवजी जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी या पोस्टद्वारे करण्यात आली. आता मंत्री, आमदार, खासदारांच्या थेट वैयक्तिक ट्विटर हॅण्डलवर गेलेल्या या मागण्यांचा कितपत विचार होतो, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.