विलास गावंडे यवतमाळ : नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दररोज कुठे ना कुठे किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहे. शुक्रवारी झालेल्या दोन अपघातात एक ठार, तर दोन जण जखमी झाले.
कारेगाव फाट्याजवळ पहाटे पाच वाजताच्या सुमारास नादुरुस्त कंटेनरवर आयचर मालवाहू वाहन आदळले. यात आयचर चालकाचा मृत्यू झाला, तर वाहक गंभीर जखमी आहे. लवदीपसिंह (रा.हरियाणा) असे मृताचे नाव आहे. कंटेनर क्रमांक एचआर ५५ - आरडी ०९९३ नादुरुस्त स्थितीत उभा होता. नागपूरवरून निघालेल्या भरधाव आयचरची (क्र.एचआर ६३ - डी ६६२३) कंटेनरला मागून धडक बसली. यात आयचरमधील चालक, वाहक गंभीर जखमी झाले. त्यांना वडनेर (जि.वर्धा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. उपचारादरम्यान चालक लवदीपसिंह यांचा मृत्यू झाला.
दुसरी घटना राष्ट्रीय महामार्गावरील मंगी फाट्याजवळ घडली. पिंपरी (सा.) ता. राळेगाव येथील अक्षय निकम यांच्या मालकीची चारचाकी (क्र.एमएच ३२ -वाय ३६७०) सकाळी ११ वाजताच्या सुमारास पांढरकवडाकडून वडकीकडे येत होती. मंगी फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी उलटली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालक अभय खिरटकार रा. किन्ही जवादे, ता.राळेगाव हा जखमी झाला आहे.