लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने यवतमाळ जिल्ह्याची केंद्र शासनाने रेड झोनसह हॉट स्पॉट म्हणून नोंद घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून ५०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीतून तत्काळ अडीच कोटी रूपयांचे अनुदान मंजूर केले.जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १० वर गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली. यामुळे कोरोना संसगार्साठी जिल्हा अतिसंवेदनशील ठरला. हा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये व त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावे, यासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या आणि मुलींच्या नवीन वसतीगृहाचे रूपांतर ५०० खाटांच्या अद्ययावत रूग्णालयात करण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात घेण्यात आला. या रूग्णालयात कोरोनाबाधितांवर औषधोपचार, चिकित्सालयीन साहित्य, स्वच्छताविषयक बाबी, विविध किट्स, रसायने व आवश्यक साधनसामग्रीकरीता प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीतून तातडीने एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. यामुळे भविष्यात अशा रूग्णांवर अद्ययावत उपचार करणे सोईचे होणार आहे.याशिवाय सध्या करोना संशयितांचे अहवाल तपासणीकरीता नागपूर येथे पाठवावे लागतात. हे अहवाल विलंबाने प्राप्त होत असल्याने प्रशासन आणि रूग्ण दोघांचाही जीव टांगणीला लागतो. ही अडचण जाणून घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच करोना चाचणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणेस दिशा निर्देश करून करोनाबाधित व संशयितांची तपासणी करण्याकरीता व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी (व्हीआरडीएल) उभारण्याचा निर्णय घेतला. या सुसज्ज प्रयोगशाळेकरीता प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीतून दीड कोटींचा निधी मंजूर केला. या निधीतून प्रयोगशाळेकरीता लागणारी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्य खरेदी केले जाणार आहे. अनुक्रमे एक आणि दीड कोटींच्या या दोन्ही निधींच्या वितरणाबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष एम.डी. सिंह यांनी प्रशासकीय मान्यता देऊन आदेश निर्गमित केले.कोरोना विरोधात लढाईस बळ पालकमंत्री संजय राठोडकोरोना विरोधात लढाई लढण्यासाठी यंत्रणेस बळ मिळावे आणि येथील रूग्णांची वैद्यकीय सुविधांअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीतून या सुविधा उपलब्ध करून दिल्या. येत्या आठवडाभरात ५०० खाटांचे हे रूग्णालय व कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
यवतमाळात कोरोना चाचणी प्रयोगशाळा व अद्ययावत रूग्णालयासाठी अडीच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 7:00 PM
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून ५०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीतून तत्काळ अडीच कोटी रूपयांचे अनुदान मंजूर केले.
ठळक मुद्देपालकमंत्री संजय राठोड यांनी खनिज विकास निधीतून दिली मंजूरी