यवतमाळ : हिरे आणि मोत्यांनी मढविलेल्या दागिन्यांची खरेदी करताना पैशाच्या बॅगेत मिठाचे पुडे ठेऊन वणी येथील एका सोने व्यापाऱ्याची फसगत करणाऱ्या दोघांना वणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील दिलीपपूर येथे बेड्या ठोकल्या. ही फसवणुकीची घटना १६ ऑगस्ट २०२२ रोजी वणीत घडली होती.
अर्शद हुसेन उर्फ बबलू उर्फ ऐसउद्दीन पुत्र गुलहसन (४३) रा.गोपालपूर (उत्तरप्रदेश), तौसीर अहेमद उर्फ पप्पू वसीम अहेमद (३७) रा.थाहीपूर (उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. येथील सराफा व्यापारी विनोद तुळशीदास खेरा यांच्या पत्नीला मिळालेले वडिलोपार्जीत दागिन्यांची त्यांना विक्री करायची होती. याच काळात खेरा यांची ओळख त्या दोघांशी झाली. या दोघांनी वडिलोपार्जीत दागिन्यांना चांगली किंम्मत मिळवून देतो, असे खेरा यांना सांगितले. आरोपी बऱ्याच दिवसांपासून खेरा यांच्या संपर्कात होते. दरम्यान, १६ ऑगस्ट २०२२ रोजी अर्शद हुसेन याने खेरा यांना फोन करून दागिने तयार ठेवा, खरेदीला पैसे घेऊन येत आहे, असे सांगितले. त्याच रात्री १०.२० वाजता दोन इसम लाल रंगाची बॅग घेऊन खेरा यांच्या घरी आले. खेरा यांनी या दोघांना दागिने दाखविले. आरोपींनी दागिने न पाहताच, ते खिशात ठेवले व आतल्या खोलीत जाऊन पैसे मोजू, असे सांगितले. त्यानुसार सर्वजण खेरा यांच्या घरातील आतल्या रूममध्ये गेले.
यावेळी पैशाच्या बॅगेला कुलूप लावून होते. बॅग चावी सापडत नसल्याचा बहाणा करून दोनही आरोपी चाबी घेऊन येतो म्हणून घराबाहेर पडले व तेथून ते पळून गेले. खेरा यांनी या ठगसेनांना दिलेल्या दागिन्यांमध्ये मोत्यांच्या चार बांगड्या, डायमंड पत्ती नेकलेस, खऱ्या मोत्याचा हार, मोत्याची माळ, हिरे आणि माणिकची अंगठी, नाकातील नथ, अशा एकूण १० लाख रूपयांच्या दागिन्यांचा समावेश होता. फसगत करून आरोपी निघून गेल्यानंतर आरोपींनी दिलेल्या बॅगेची तपासणी केली असता, बॅगमध्ये मिठाचे पुडे ठेऊन असल्याचे दिसून आले.
दरम्यान, १० जून रोजी वणी पोलिसांना या प्रकरणातील आरोपी प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथे एका विवाह समारंभासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक माधव शिंदे, पोलिस हवालदार योगेश डगवार, नायक पोलिस शेख इकबाल, सचिन मडकाम, हरिंद्रकुमार भारती यांचा समावेश असलेले पथक आरोपींच्या शोधासाठी प्रतापगड येथे पोहोचले. तेथे आरोपींना अटक करून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ वाहनदेखिल जप्त केले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.