यवतमाळ : अक्षय तृतीयेच्या दिवशी बालविवाहांचे प्रमाण वाढते, ही बाब लक्षात घेऊन प्रशासन अलर्ट असतानाही जिल्ह्यात चक्क दोन बालविवाह समारंभपूर्वक आयोजित करण्यात आले. मात्र याची माहिती मिळताच बाल संरक्षण कक्षाचे पथक थेट एका लग्नमंडपात धडकले, तर दुसऱ्या बालवधूच्या घरी धडकले. यावेळी लग्नमंडपात जमलेल्या वऱ्हाडी मंडळींची चांगलीच पळापळ झाली.
रविवारी २३ एप्रिल रोजी पांढरकवडा तालुक्यातील पाथरी गावात सकाळी ११ वाजता एका मुलीचा बालविवाह लावून दिला जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळाली. सकाळी ९ वाजता हा फोन येताच बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी माधुरी पावडे तातडीने पांढरकवड्यात पोहचल्या. पांढरकवड्याचे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलिस जमादार सुनील कुंटावार तसेच गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हे पथक थेट लग्नमंडपातच धडकले. त्यावेळी मुलीच्या लग्नाची खातरजमा केली असता तिचे वय केवळ १६ वर्षे आढळले. त्यामुळे हा विवाह थांबविण्यात आला व अल्पवयीन वधूला सोमवारी बालकल्याण समितीपुढे हजर केले जाणार आहे.
तर दुसरा बालविवाह यवतमाळ तालुक्यातील एका गावात ठरला होता. या घरातील दोन बहिणींचे एकाच दिवशी म्हणजे २४ एप्रिल रोजी आर्णी मार्गावरील ख्यातनाम मंगल कार्यालयात लग्न लावून दिले जाणार होते. त्यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळताच संबंधित वधूपित्याच्या घरी धडक देण्यात आली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे, माधुरी पावडे यांनी पालकांना समज दिली.
मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचे लग्न न करण्याच्या सूचना पालकांना देण्यात आल्या. त्यामुळे केवळ साडेसतरा वर्षे वय असलेल्या मुलीचे लग्न रद्द करण्यात आले. तिला बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. तर दुसऱ्या बहिणीचे वय योग्य असल्याने तिचे नियोजित लग्न सोमवारी पार पडणार आहे. या दोन्ही कारवाया जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या.
तिसऱ्या बालविवाहावरही वाॅच
रविवारी दोन बालविवाह रोखल्यानंतरही आणखी एका बालविवाहाची गोपनीय माहिती महिला व बाल विकास विभागाकडे पोहोचली आहे. पुढील आठवड्यात हा बालविवाह नियोजित आहे. मात्र तत्पूर्वीच संबंधितांकडे पोहोचून तो रोखला जाईल, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील व सामाजिक संस्था कर्मचाऱ्यांना सतत प्रशिक्षण देणे सुरू आहे. बालविवाह या अनिष्ट प्रथेस प्रतिबंध करण्याकरिता समाजातील सर्व घटकांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही राजूरकर म्हणाले.