लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झालेला आहे. रुग्णसंख्या शंभरीकडे जात असताना दुसरीकडे उपचारांना यश मिळण्याचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर दहा रुग्णांना एप्रिल महिन्यातच बरे करून घरी पाठविण्यात मेडिकल प्रशासनाने यश मिळविले.शनिवारपर्यंत येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ८५ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू होते. दरम्यान, यातील चार जणांचा दुसरा आणि तिसरा स्वॅब नमुन्यांचा अहवाल सलग निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर लगेच रविवारी आणखी १८ जणांना घरी सोडण्यात आले. या सर्व २२ जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी मिळाली तरी पुढचे १४ दिवस त्यांना घरातच वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याची मेडिकल प्रशासनाने सांगितले.एकीकडे पॉझिटीव्ह टू निगेटीव्ह असे यश मिळत असतानाच रविवारी इंदिरानगरातील एकाचा अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सध्या आयसोलेशन वॉर्डात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६३ झाली आहे.गेल्या चार दिवसात वैद्यकीय महाविद्यालयातून २९६ नमुने तपासणीला पाठविले. यापैकी २२१ नमुने निगेटीव्ह आले आहे. सद्यस्थितीत ५३ नमुने अप्राप्त आहे. उमरखेड तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १८ जणांना ट्रेस करण्यात आले. त्यातील तिघांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, तर महागाव आणि उमरखेड हे दोन तालुके मिळून १५ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. दारव्हा तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे.टप्प्याटप्प्याने उघडणार दुकानेरुग्णांची संख्या कमी होताच जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ उघडण्याचे आदेश काढले आहे. यामध्ये कापड, अंडरगारमेंटस, बुटीक अॅन्ड मॅचिंग सेंटर, टेलरिंग, फुटवेअर, लाँड्री, कुशन व कर्टंन्स, घड्याळ विक्री व दुरुस्ती, बुक स्टॉल, जनरल अॅन्ड स्टेशनरी स्टोअर्स, पेपरमार्ट, भांडे विक्री इत्यादी दुकाने रविवार, सोमवार, मंगळवार असे तीन दिवस सकाळी ८ ते दुपारी २ या वेळात उघडी राहणार आहेत. बॅनर पेंटींग, आॅफसेट अॅन्ड प्रिंटींग्स, फोटो स्टुडिओ, इंजिनियरींग व वेल्डींग वर्क, मार्बल, ग्रेनाईट अॅन्ड टाईल्स, प्लायऊड अॅन्ड सनमाईका, पेंट व पेंटींग साहित्य, कॅटरर्स अॅन्ड बिछायत केंद्र, स्पोर्टस, टॉईज अॅन्ड म्युझिकल्स इत्यादी दुकाने बुधवार, गुरुवार दोन दिवस ८ ते २ उघडी राहणार आहेत. गॅस शेगडी दुरुस्ती, सायकल स्टोर्स, मोबाईल विक्री व दुरुस्ती, संगणक दुरुस्ती, फर्निचर, क्रॉकरी, सायबर कॅफे, कार अॅसेसरीज, बॅग सेंटर, सराफा, आर्टीफीशिअल ज्वेलरी बँगल, गिफ्ट सेंटर, काचेचे ग्लास ही दुकाने शुक्रवारी, शनिवारी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळात उघडी राहणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा जारी केले.
दोन दिवसात २२ जणांची कोरोना विषाणूवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:00 AM
शनिवारपर्यंत येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ८५ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू होते. दरम्यान, यातील चार जणांचा दुसरा आणि तिसरा स्वॅब नमुन्यांचा अहवाल सलग निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर लगेच रविवारी आणखी १८ जणांना घरी सोडण्यात आले.
ठळक मुद्देअॅक्टीव्ह रुग्णसंख्या ६३ : १४ दिवस वैद्यकीय निगरानी कायम