यवतमाळ : जुना राग धुमसत असला की भांडणासाठी किरकोळ कारणही पुरेसे होते. बिचाऱ्या बकऱ्याच्या कारणावरून जिल्ह्यात दोन ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या असून, या प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे शेख रफीक शेख इसा यांनी बकरीला पिण्यासाठी बादलीमध्ये पाणी ठेवले होते. ते पाणी बकरीच्या पायाने खाली सांडले. हेच पाणी शेजाऱ्याच्या अंगणात गेल्याने शेजारी शेख जलील शेख घाडू यांनी शेख रफीक यांच्या आईला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यावेळी शेख रफीक हे मधे गेले असता शेख जलील शेख घाडू यांनी शेख रफीक यांनाही काठीने मारहाण करून जबर जखमी केले. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, दुसऱ्या घटनेत बकऱ्यांनी शेतात जाऊन तूर खाल्ल्याने एकास जबर मारहाण करण्यात आली. ही घटना दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे घडली. संजय रघुनाथ नागमोते यांच्या बकऱ्या संतोष सुखदेव पवार (रा. तिवसा) यांच्या शेतात तूर खात असल्याने संतोष पवार यांनी बकऱ्या शेताच्या बाहेर हाकलल्या. यावर संजय नागमोते याने दारूच्या नशेत तू माझ्या बकऱ्या का हाकलल्या, असे म्हणून वाद केला. तसेच शिवीगाळ करीत काठीने संतोष पवार यांना मारहाण केल्याच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राळेगाव येथून तीन बकऱ्या पळविल्या
राळेगाव येथील सुरेंद्र जगनराव तुमाने (वय ४२, रा. वाॅर्ड नं. ११ शांतीनगर) यांच्या २७ हजार रुपयांच्या तीन बकऱ्या गाडीमध्ये घालून पळवून नेण्यात आल्या. याप्रकरणी तुमाने यांनी राळेगाव ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.