लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे यात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात महागाव-उमरखेड रस्त्यावर मातोश्री शाळेपुढे गुरुवारी रात्री १०.३० वाजता घडला. धडक इतकी भीषण होती की, ट्रकने दुचाकीला एक किमी फरफटत नेले.ओम संजय सोळंके (२५, रा. पोहंडूळ) आणि शंतनू दिगंबर माटाळकर (२२, रा. महागाव) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीने रात्री हॉटेलमध्ये जेवण करून गावाकडे परत निघाले होते. त्याच वेळी लातूरवरून तूर घेऊन नागपूरकडे निघालेल्या भरधाव ट्रकने (एमएच-२६बीई-५१९७) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यानंतर दुचाकी ट्रकला अडकून बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेली. यात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार विलास चव्हाण तसेच गावातील नागरिक गणेश भोयर, संतोष जाधव, आकाश पानपट्टे, तेजस नरवाडे, अमोल गावंडेसह पोहंडूळ आणि करंजखेड येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मृतांच्या खिशातील आधार कार्डावरून त्यांची ओळख पटविली. पोलीस बंदोबस्त घटनास्थळी येईपर्यंत संतप्त नागरिकांनी ट्रकची बरीच तोडफोड केली. नंतर ठाणेदारांनी ट्रक सुरक्षित स्थळी हलविला. संबंधित ट्रकचालक विश्वंभर डोंबरे हा अपघातानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अपघातातील एका मृतावर शुक्रवारी सकाळी पोहंडूळ येथे तर दुसऱ्यावर करंजखेड येथे अंत्यसंस्कार झाले.
चावीविना गाडी सुरु करुन गेला होता जेवायला- घटनेच्या दिवशी शंतनू आणि ओम या दोघांनीही महागाव येथे जाऊन हॉटेलमध्ये जेवणाचा बेत आखला होता. मात्र रात्रीच्या वेळी दुचाकीने जाऊ नको म्हणून घरातील मंडळींनी ओमला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याला दुचाकीची चावीही दिली नाही. परंतु मित्रासोबत बाहेर जाऊन जेवणाचा हट्ट भागविण्यासाठी ओमने चक्क चावीविनाच दुचाकी सुरू केली आणि महागावपर्यंत आला. तेथून दोन्ही मित्र उमरखेड रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. तेथून परत येताना ट्रकच्या रूपात आलेल्या मृत्यूने त्यांचाच घास घेतला.
कुटुंबांचा आधारच गेला- या घटनेतील एक मृतक शंतनू माटाळकर हा महागाव येथे एका खासगी लॅबमध्ये काम करीत होता. त्याला आई-वडील नाही. त्याच्या मागे दोन विवाहित बहिणी आहेत. त्याच्या कुटुंबातील तो एकमेव कर्ता होता. तर दुसरा मृतक ओम सोळंके हा कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये खासगी काम करीत होता. पोहंडूळ येथे त्याचे आई-वडील, भाऊ व लहान बहीण राहते. घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे दोन दिवसापूर्वीच तो पोहंडूळ येथे आला होता. मात्र गुरुवारी रात्री अपघाताने दोन कुटुंबांचे आधार असलेले हे जीव हिरावले.