इसापूर धरणात सध्या १२६४.७२ इतका पाणीसाठा असून पाणी पातळी ४४०.८५ मीटर आहे. तर उपयुक्त जलसाठा ९४९.७५ दलघमी असून त्याची टक्केवारी ९८.५१ इतकी आहे. सोमवारी दुपारी पैनगंगा नदीला साडीचोळी व ओटी भरुन पूजा करून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. पाणी पातळीच्या वाढीनुसार गेट सोडण्यात येईल, असे पूर नियंत्रण कक्ष उपविभागीय अधिकारी हनुमंत धुळगुंडे यांनी सांगितले. धरणावर १५ दरवाजे असून २००६ मध्ये हे सर्व दरवाजे उघडण्याची वेळ आली होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी पाण्याचा विसर्ग करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचेही उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ए.बी. जगताप, उपअभियंता धुळगुंडे म्हणाले. नदी काठच्या गावातील मालमत्तेचे, पशुधनाचे नुकसान होणार नाही यासाठी सूचना देण्यात आल्या.
इसापूर धरणाचे दोन दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:49 AM