ज्ञानेश्वर मुंदे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : पती-पत्नी संसाररुपी रथाची दोन चाके. यातील एक चाक निखळले तरी संसाराचा गाडा रुळावरून घसरतो. काही दिवसच नव्हे तर संसारवेलीवर फुल उमलल्यानंतरही पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण होते. दोन जीवांची ताटातुट होण्यासोबतच अपत्यांचाही आधार तुटतो. अर्थात याला विविध कारणे आहे. अशा तुटणाऱ्या संसाराची विण अधिक घट्ट करण्याची महत्वपूर्ण भूमिका यवतमाळचा महिला सेल बजावत आहे. वर्षभरात दोनशे संसार रुळावर आणण्याची किमया या सेलने साधली आहे.कौटुंबिक कलहाच्या घटनांत अलिकडे वाढ झाली आहे. पती-पत्नीचा हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतो. टोकाचा निर्णय घेत मुलाबाळांचाही विचार केला जात नाही. पोलीस ठाण्यापर्यंत आलेल्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्याची महत्वाची भूमिका पोलीस अधीक्षकांच्या अधिनस्त महिला सेल बजावत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली की, थेट महिला सेलकडे पाठविले जाते. महिला सेल दोनही कुटुंबांना एकत्र बसवून त्यांचे समूपदेशन करते. त्यातून विस्कटलेली संसाराची घडी बसविण्याचा प्रयत्न होतो. यवतमाळ येथील महिला सेलकडे २०१७ मध्ये ११७ आणि जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यात ६७ प्रकरणे दाखल झाली आहे. यातील बहुतांश कुटुंबांचे समूपदेशन करण्यात आले. वाद-विवाद मिटविण्यात यश आले. त्यामुळेच वर्षभरात दोनशेवर कुटुंबांचा संसार सुखाचा झाला.समूपदेशन करताना महिला सेलमधील अधिकाऱ्यांना प्रत्येकवेळी नवीन अनुभव येतो. समूपदेशन करताना सुशिक्षितच ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. प्रत्येकजण आपला ईगो पुढे करतात. त्यांना समजावून सांगणे कठीण होते. ही मंडळी मुला-बाळांचा विचार न करताही टोकाचा निर्णय घेतात. त्यापेक्षा अशिक्षित कुटुंब सहज समूपदेशनाला प्रतिसाद देत असल्याचा अनुभव यवतमाळ येथील महिला सेलला अनेक प्रकरणातून आला आहे.संयमामुळेच संसार सुखाचा- विजया पंधरेमहिला सेलकडे येणारी प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यावर भर दिला जातो. दोन्हीकडील कुटुंबांना एकत्र बसवून त्यांचे समूपदेशन केले जाते. प्रत्येक प्रकरणात वेगवेगळा अनुभव असतो. त्यावर मात करीत दोन जीव एकत्र कसे नांदतील, यावर भर दिला जातो. विदेशात स्थायिक झालेली सहा प्रकरणे आमच्याकडे दाखल झाली होती. त्यातून तीन प्रकरणात मने जुळविण्यात आम्हाला यश आले. कोणताही प्रसंग असो, संयम ठेवण्याची गरज आहे. संयामामुळेच संसार सुखाचा होऊ शकता असे महिला सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे यांनी सांगितले.मोबाईल ठरतोय वादाचे कारणदिवसभर मोबाईलमध्ये मान खुपसून बसणे कौटुंबिक कलहाचे महत्वाचे कारण ठरत आहे. पती किंवा पत्नी मोबाईलचा अतिवापर करीत असेल तर त्यातून वाद-विवाद होतात. संशयीवृत्ती बळावते. एकमेकांचे फोन तपासले जातात. त्यातून वाद विकोपाला गेल्याची अनेक प्रकरणे महिला सेलकडे आली आहे. यासोबतच पतीची व्यसनाधिनता, संशयीवृत्ती, प्रेमविवाहाला कुटुंबातून झालेला विरोध, सासू-सुनेचा वाद, आई-वडिलांच्या अतिलाडात वाढलेली मुलगी यातून कौटुंबिक कलह वाढतात, असा अनुभव महिला सेलला अनेक प्रकरणातून आला आहे.
दोनशे वर कुटुंबांचा संसार सुखाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:08 PM
पती-पत्नी संसाररुपी रथाची दोन चाके. यातील एक चाक निखळले तरी संसाराचा गाडा रुळावरून घसरतो. काही दिवसच नव्हे तर संसारवेलीवर फुल उमलल्यानंतरही पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण होते.
ठळक मुद्देमहिला सेलची मध्यस्थी : कलहाची सर्वाधिक प्रकरणे सुशिक्षितांची