यवतमाळ : आर्णी आणि वणी तालुक्यांत वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. आर्णी तालुक्यातील शेलू (शें.) शिवारातील एका शेतातील टिनाच्या शेडवर वीज कोसळली. यात शेतकरीपुत्र जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही तालुक्यांत हळहळ व्यक्त होत आहे.
रविकांत तुकाराम राठोड (वय २७) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पाऊस सुरू झाला. त्यावेळी रविकांत भाऊ आणि वडिलांसह शेतात काम करीत होते. पावसामुळे त्यांनी शेतातील टिनाच्या शेडचा आश्रय घेतला. त्याचवेळी वीज कोसळल्याने तो जागीच ठार झाला. त्याचे वडील आणि भाऊ थोडक्यात बचावले. रविकांतच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, आई, भाऊ असा आप्त परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुर्ली शिवारात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. विशाल मारोती गायकवाड (वय ३३) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. दरम्यान, शेतातून घरी जात असताना विशालच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर विशालच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.