लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील उमरसरा भागात सुरभीनगर येथे दीड महिन्यांपूर्वी एक पूल तुटला. मात्र अद्याप तो त्याच अवस्थेत असल्याने तेथील नागरिकांना शहरात येण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा फेरा सहन करावा लागत आहे. त्या भागातील नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपरिषदेकडे निधीच नाही तर आम्ही विकास कामे व दुरुस्ती करावी कशी, असा उलट सवाल भाजपचे नगरसेवक दिनेश चिंडाले नागरिकांना विचारत आहेत. विशेष असे, या तुटलेल्या पुलामुळे विकास कामातील निकृष्टताही अधोरेखित झाली आहे.
उमरसरा भागातील सुरभीनगरात जाण्यासाठी नाल्यावर दोन बाजूने दोन पूल बांधण्यात आले आहे. बारा ते पंधरा वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्यापैकी एक पूल दीड महिन्यांपूर्वी ट्रकच्या वाहतुकीत खचला, तर दुसरा पूल दोन वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद होता. या पूलाचा एक भाग खचला होता. पुलाला मध्यभागी मोठे छिद्र पडले होते. आता दोनही पूल बंद आहे. यामुळे एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा रस्ताच नाही. पायदळ जाण्यासाठी तुटलेल्या पुलावरून कसरत करावी लागते. यातून या भागात दररोज अपघात होत आहे.
दुचाकी, चारचाकी व इतर वाहने याठिकाणावरून काढता येत नाही. त्याकरिता दीड ते दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामुळे आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना बाहेर जाताना हा वळसा केल्यानंतर बाहेर पडता येते. याठिकाणी घंटागाडी, भाजीपाला अथवा कुठलाही आॅटोरिक्षा प्रवेश करत नाही. या संदर्भात या भागातील नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली. मात्र नगरपालिकेकडे हा विषय सभागृहात मांडला गेला नाही. त्यांच्याकडे या कामासाठी निधी नाही. यामुळे हा प्रश्न अजूनही तसाच आहे. या भागातील दुसऱ्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम अपूर्ण आहे.नगरसेवक फिरकलेच नाहीआमच्या भागात रस्ता खचल्यानंतर नगरसेवक फिरकलेच नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात नाही, अशी खंत या भागातील नंदा पाटील, उषा क्षीरसागर, पुष्पा राऊत, हनुमंत अंभोरे यांनी व्यक्त केली.नगरपालिकेकडे रस्त्यासाठी निधी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत विविध ठिकाणावरून तरतूद करीत पुुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. दुसऱ्या पुलासाठी प्रयत्न केला जात आहे.- दिनेश चिंडाले, नगरसेवक