यवतमाळ : पतीने अंगावर रॉकेल ओतून पत्नीला पेटवून देवून तिच्या हत्त्येचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. एकीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे कृत्य करण्यात आले तर दुसरीने दारू पिण्यास व जुगार खेळण्यास पैसे दिले नाही म्हणून तिला संपविण्याचा प्रयत्न केला गेला.बाभूळगाव तालुक्यातील कोठा येथे ६ मार्चच्या दुपारी २ वाजता घटना घडली. रामकृष्ण पांडुरंग दिघुरे याने पत्नीला मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. ११ टक्के जळालेल्या अवस्थेत तिला उपचारार्थ दाखल करण्यात आले. बाभूळगाव पोलिसांनी रामकृष्णविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला. नेमकी अशीच दुसरी घटना पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळखुटा येथे घडली. सुभाष रामराव जाधव याने दारू व पत्त्यासाठी पैसे न दिल्याने पत्नी लक्ष्मीबाई सुभाष जाधव (३६) हिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. ती यात ७८ टक्के जळाली असून आरोपी सुभाष घटनास्थळावरून पसार झाला. लक्ष्मीला प्रथम पुसद व नंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुसद ग्रामीण पोलिसांनी सुभाषविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. विवाहितेचा छळयवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत जोडमोहा येथील गजानन गोपाल लिल्हारे व त्याच्या कुटुंबातील अन्य चार सदस्यांनी माहेरवरून पैसे आणण्याच्या कारणावरून गजाननच्या पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. पोलिसांनी गजाननसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.हत्त्येचा प्रयत्न यवतमाळच्या सेवानगरातील नरेंद्र ब्राह्मणे याचा चौसाळा रोडवर ६ मार्चच्या दुपारी सत्तुरने डोक्यावर मारून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. नरेंद्रचा भाऊ गोपीचंदच्या तक्रारीवरून वाघाडीनगर येथील सुधाकर बेले याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात दोन विवाहितांना पेटविले
By admin | Published: March 08, 2015 2:05 AM