लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने पिकांची वाढ समाधानकारक झाली. मात्र दसरा सणाच्या पूर्वी एखादा मोठा पावसाचा ठोक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक होता. मात्र तो न आल्याने आता कपाशीची झाडे सुकू लागली आहेत. पाऊस चांगला झाल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना तीन ते चारवेळा कापसाचा वेचा करावा लागतो. मात्र यंदा पावसाने कापूस उत्पादकांचे सारे गणितच बिघडवून टाकले आहे.मागील वर्षी बोंडअळीच्या प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उद्वीग्न होऊन आपल्या शेतातील हिरव्यागार कपाशीवर नांगर फिरवून पीक उद्ध्वस्त केले. मात्र त्यातूनही स्वत:ला सावरत शेतकऱ्यांनी यावर्षी हंगामाची तयारी केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अगदी वेळेवर पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र नंतर गरजेच्यावेळी पावसाने पुन्हा दडी मारली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मात्र पावसाने साथ दिल्याने शेतकरी सावरला. शेतात हिरवीगार पिके डोलू लागली. बोंडअळीचे संकट फारसे न आल्याने शेतकरी आनंदी होता. गरज होती ती एका मोठ्या पावसाची. मात्र परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना दगा दिला. या भागात परतीचा पाऊसदेखील हवा तसा कोसळला नाही. त्यामुळे शेतातील ओल कमी होऊन आता कपाशीची झाडे सुकू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी केवळ एकच वेचा केला. त्यांचे उत्पादन अर्ध्यावर आले. एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र वणी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंबंधाने सरकारने अद्यापही पाऊल न उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. दिवाळीच्या सणामुळे शेतकऱ्यांनी व्यापारी मागेल त्या भावात कापसाची विक्री केली. सोयाबीन, तुरीचेदेखील तेच हाल झालेत. अनेक शिवारे आता पिकांअभावी ओस दिसू लागली आहे. ओलित करणाºया शेतकऱ्यांत बोंडअळीची भीती अद्यापही आहे.
दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 10:00 PM
यंदा ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एक ते दोन वेच्यातच शेताची उलंगवाडी होत आहे. सोयाबीन आणि तूर पिकाचीही अवस्था बिकट असून यावर्षी उत्पादन अर्ध्यावर होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देउत्पादन अर्ध्यावर : सोयाबीन, कापूस, तुरीला अल्प पावसाचा फटका