विशाल सोनटक्के / यवतमाळ: अवैधरीत्या अग्नीशस्त्र बाळगून असणाऱ्या दोघांंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून दोन अग्नीशस्त्रासह जीवंत काडतूस असा सुमारे १ लाखांंचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गाझीअली अप्सर अली रा. कळंब चौक यवतमाळ व प्रफुल्ल भारत शंभरकर रा. सेजल रेसिडेन्सी यवतमाळ हे दोघे शहरातील पांढरकवडा रोडवरील मालाणी बागेसमोर असलेल्या आरटीओ ऑफीस परिसरात देशी बनावटीच्या पिस्टलसह फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने आरटीओ परिसर गाठला असता तेथे दोन इसम संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे आढळले. त्यांची विचारपूस केली तसेच अंगझडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये देशी बनावटीच्या काळ्या रंगाची मॅग्झीन असलेल्या प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीच्या दोन पिस्टल आढळून आल्या. सोबत दोन जीवंत काडतूसही होती.
पथकाने या दोघांनाही ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व कलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, पोलिस अमलदार विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ आदींनी पार पाडली.