पुसद : माहूर येथील दुहेरी हत्याकांडातील पाच आरोपींच्या अटकेनंतर आता पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, लवकरच सुपारीचा मास्टर मार्इंड पुढे यईल अशी माहिती आहे. दरम्यान याप्रकरणाचा तपास माहूर पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. माहूर येथील रामगड किल्ल्यातील हत्ती दरवाज्याजवळ पुसद येथील अभियांत्रिकीची विद्यार्थिंनी निलोफर मारिया खालिद बेग मिर्झा व तंत्रनिकेतनचा विद्यार्थी शहारूख खान पठाण रा. उमरखेड या दोघांचा निर्घृण खुन करण्यात आला होता. नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच येथील दोघांची नावे पुढे आली. त्यावरून संशयीत अनवर रा. पुसद आणि कैसर या दोघांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच याप्रकरणाचा तपास माहूर पोलिसांकडून काढून गुन्हे अन्वेषण विभागाच्या सुपुर्द करण्यात आला आहे. या दोघांचीही नांदेड पोलीस कसून चौकशी करत आहे. लवकरच सुपारीच मास्टर मार्इंड पुढे येईल असे सांगण्यात आले. दरम्यान दुहेरी हत्याकांड घडविणाऱ्या आरोपींना पाच लाख रुपये दिल्याची चर्चा आहे. घटनेच्या दिवशी निलोफर आणि शहारूख इंडिका कारने माहूरला गेले. रामगड किल्ल्यावर पोहोचताच याची माहिती मारेकऱ्यांना देण्यात आली. मात्र आरोपींना या दोघांना मारण्याबाबत सूचना दिली नव्हती. अखेरच्या क्षणी शहरूख व निलोफरची हत्या करा असा संदेश जावेद पेंटरला मिळाला आणि या दोघांवर कुऱ्हाड व खंजीराने वार करण्यात आले, अशी माहिती आहे. (वार्ताहर)
युगूल हत्याकांडात दोन संशयित जाळ्यात
By admin | Published: November 01, 2014 1:12 AM