यवतमाळ : सर्वांनाच अतिरेकी वेगाचे वेड लागले आहे. त्यातून धूमस्टाइल बेभान गाड्या हाकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून शुक्रवारी दोन तरुणांच्या भरधाव वाहनांची जबर धडक झाली. दाेन्ही वाहनांवरील एक-एक जण जखमी झाला. मात्र, आपली काहीच चूक नाही, समोरच्यानेच ॲक्सिडेन्ट घडविला, असा दावा करीत या दोघांनीही पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या.
हा अपघात शुक्रवारी दुपारी दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे उर्दू महाविद्यालय परिसरात घडला. सय्यद नदीम सय्यद जमील (३२), रा. वाशिम बायपास, अकोला हे एमएच ३० बीएन ९५०७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही होता. याच रस्त्याने लाडखेड येथील मीनल अब्दुल शेख (३०) हे एमएच २९ बीआर २१७५ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. त्यांच्यासोबत दुचाकीवर त्यांची भाचीही होती.
या दोन्ही वाहनांचा अपघात झाल्याने चारचाकीमधील सय्यद नदीम यांचा मित्र तर दुचाकीवरील मीनल शेख यांची भाची जखमी झाली. मात्र, अपघात नेमका कसा झाला यावरून वाद निर्माण झाला आहे. दोघांनीही लाडखेड पोलीस ठाणे गाठून एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. सय्यद नदीम यांच्या तक्रारीनुसार मीनल शेख यांनी भरधाव दुचाकीचा अचानक यू-टर्न मारल्याने चारचाकीला धडक बसली. मात्र, मीनल शेख यांच्या तक्रारीनुसार सय्यद नदीम यांनीच आपली चारचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला ठोस मारली. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. आता नेमका दोष कुणाचा हे शोधण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे.