राजू राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कलोणबेहळ : वडिलांच्या छातीत दुखू लागले. त्यांंना लोणबेहळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु तेथे केवळ परिचारिकाच. अशा स्थितीत मुलाने त्यांच्यासह दुचाकीवरून आर्णी गाठण्याचा निर्णय घेतला. पहाटे ४ वाजता आईसह तो दुचाकीने आर्णीकडे निघाला. परंतु घात झाला, मधातच दुचाकीतील पेट्रोल संपले. उर फुटेपर्यंत धावत जाऊन त्याने पेट्रोल आणले. मात्र तोपर्यंत वडिलांची प्राणज्योत मालवली होती.आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथे बुधवारी पहाटे घडलेली ही हृदयद्रावक घटना. विलास नामदेव पांडव (४८) असे मृत वडिलांचे नाव आहे. बँडचा व्यवसाय करणाºया विलास यांच्या छातीत बुधवारी पहाटे दुखू लागले. त्यामुळे मुलगा आकाशने त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु तेथे केवळ परिचारिकाच असल्याने उपचार होऊ शकले नाही. त्यांना आर्णीच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली. परंतु तीही व्यवस्था झाली नाही. अशा स्थितीत वडिलांना घेऊन आकाशने दुचाकीने आर्णी गाठण्याचा निर्णय घेतला. आई अन्नपूर्णा आणि वडील विलास यांना दुचाकीवर बसविले. आर्णीकडे जाताना पहाटे ४ वाजता प्रिया नर्सरीजवळ दुचाकीतील पेट्रोल संपले. पहाटेची वेळ असल्याने मदत मिळण्याची शक्यता नव्हती. आई-वडिलांना थांबवून आकाश अर्धा किलोमीटर अंतरावरील पेट्रोलपंपाकडे धावत निघाला. मात्र पहिल्या पेट्रोलपंपावर पेट्रोलच नव्हते. पुन्हा पुढच्या पेट्रोलपंपाकडे उर फुटेपर्यंत धावत गेला. पेट्रोल घेऊन तेवढ्याच वेगाने परत आला. परंतु इकडे विलास चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पेट्रोल घेऊन आलेल्या मुलाने वडिलांचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले असते तर विलासचे प्राण वाचले असते, असे म्हणत गावात हळहळ व्यक्त होत आहे. विलासच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
दुचाकीतील पेट्रोल संपले, अन् वडिलांचे प्राण गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:29 PM
वडिलांच्या छातीत दुखू लागले. त्यांंना लोणबेहळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु तेथे केवळ परिचारिकाच. अशा स्थितीत मुलाने त्यांच्यासह दुचाकीवरून आर्णी गाठण्याचा निर्णय घेतला.
ठळक मुद्देलोणबेहळची घटना : हृदयरुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाही