सोनखास (यवतमाळ) : नेहमीप्रमाणे दोन मित्र रात्री टॉर्च घेऊन नाल्याच्या काठावर खेकडे पकडण्यासाठी गेले. खेकड्याच्या शोधात ते जांबवाडी शिवारापर्यंत पोहोचले. दोघेही रात्र उलटूनही घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी सकाळी त्यांचा शोध सुरू केला. दोघेही जांबवाडी शिवारात नाल्याच्या काठावर मृतावस्थेत आढळून आले. या घटनेने बोरजई येथे खळबळ उडाली आहे.
श्रावण लक्ष्मण गारपगारी (३५), छत्रपती अजाबराव काळे (२५) अशी मृत युवकांची नावे आहे. या दोघांच्याही कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. रोजमजुरी करून दोघेही कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होेते. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी गेले. रात्री शेतात वन्यप्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी वीज प्रवाह कुंपनाच्या तारेत सोडला जातो. याच तारेला स्पर्श होवून दोघांचाही मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लाडखेड पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
श्रावण गारपगारी याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील आहेत. तोच त्यांच्या कुटुंबाचा आधार होता. रोजमजुरी करून तो कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता. छत्रपती काळे याच्या मागे आई, वडील, एक भाऊ व बहीण असा परिवार आहे. या घटनेने बोरजई गावात शोककळा पसरली आहे.