लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका संघटनेने बुधवारी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत लाक्षणिक आंदोलन केले. परिचारिकांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यातील परिचारिकांची सहा हजार पदे रिक्त आहे. या रिक्त पदांमुळे कार्यरत परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. त्यातच कोरोना महामारीच्या संकटात परिचारिका सर्वात पुढे लढत आहेत. या कालावधीत बंदपत्रित व कंत्राटी परिचारिकांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, ही प्रमुख मागणी आहे.कोविड वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिकांना सात दिवस ड्यूटी व सात दिवस क्वारंटाईन असा आदेश कोर्टाने दिला होता. मात्र प्रत्यक्षात या आदेशाचे पालन केले जात नाही. कोविड वॉर्डात ड्यूटी केल्यानंतरही परिचारिकांना केवळ तीन दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. इतकेच नव्हे तर कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांच्या वॉर्डात कार्यरत परिचारिकांना सुरक्षा साहित्यही पुरविले जात नाही. पीपीई किट, एन-९५ मास्क, ग्लोब्ज या साहित्यांचाही वॉर्डात पुरेसा साठा नसतो. कोविड वॉर्डातून ड्यूटी संपल्यानंतर परिचारिकांची स्वॅब तपासणी करावी, त्यानंतरच त्यांना इतर वॉर्डात किंवा विलगीकरणात सोडावे. कोविड रुग्णांची सेवा करताना परिचारिकेचा मृत्यू झाल्यास तिच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील वारसांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत घ्यावे, परिचारिका कोरोना बाधित झाल्यास अथवा तिच्या कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी रुग्णालयात राखीव जागा असावी, या सर्व अडचणी राज्य शासनाने तात्काळ सोडवाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्त्व अध्यक्ष शोभा खडसे, उपाध्यक्ष छाया मोरे, सचिव नंदा साबळे यांनी केले. यावेळी नर्सेसने फिजिकल डिस्टन्सिंग पाळत मागण्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली.
‘मेडिकल’च्या परिचारिकांचे लाक्षणिक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 5:00 AM
कोविड वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिकांना सात दिवस ड्यूटी व सात दिवस क्वारंटाईन असा आदेश कोर्टाने दिला होता. मात्र प्रत्यक्षात या आदेशाचे पालन केले जात नाही. कोविड वॉर्डात ड्यूटी केल्यानंतरही परिचारिकांना केवळ तीन दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. इतकेच नव्हे तर कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांच्या वॉर्डात कार्यरत परिचारिकांना सुरक्षा साहित्यही पुरविले जात नाही.
ठळक मुद्देदोन तास ठिय्या : विविध प्रलंबित मागण्यांसाठी केली निदर्शने