यवतमाळ : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिपाइंमध्ये यावे, आम्ही त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद देऊ, अशी ऑफर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. मंगळवारी यवतमाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी निवडणूकीत लोकसभेसाठी दोन, तर विधानसभेच्या १५ जागा भाजपकडे मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यवतमाळात पक्षबांधणीसह कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना फुटीला उध्दव ठाकरे जबाबदार आहेत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. यामुळे त्यांच्याकडून पक्षचिन्ह आणि पक्षही हिरावला गेला, असे ते म्हणाले. भाजप सर्व पक्षांना संपवायला निघाला आहे, असे म्हटले जात आहे. मात्र, तसे काहीच नाही, भाजपने एकट्याने सत्ता स्थापन केली नाही, तर सर्वांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली असल्याचे ते म्हणाले.
येणाऱ्या निवडणुकीत मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा झेंडा मुंबईत फडकेल. विधानसभेसाठीच्या १५ जागा भाजपकडे मागू त्यातील पाच जागा विदर्भातील असतील असेही त्यांनी सांगितले. मणिपूर आता शांत होत आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी तीन वेळा मणिपूरला भेट दिली आहे तरीही विरोधक या विषयावरुन लोकसभेचे सभागृह कामकाज रोखून व्यत्यय आणत आहे, हे बरोबर नाही, असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. कोणत्या वेळी कोणती भूमिका घ्यावी, हे त्यांना कळत नाही. मात्र, केव्हा कशी भूमिका घ्यावी, याच मला चांगल आकलन आहे अस ते म्हणाले. मोदींना हरवणे विरोधकांना शक्य नसल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला भूपेश थुलकर, दयाल बहादुरे, राजा सरोदे, बापुराव कदम, गौतम सोनवणे, सुधाकर तायडे, माेहन भोयर, महेंद्र मानकर, नवनीत महाजन, गोविंद मेश्राम, अश्वजित शेळके, राजन वाघमारे आदी उपस्थित होते.